येथें आतां प्रथम गोप्रसवशांन्ति सांगतों. बाळबाळंतिणींना (ज्योतिष्यानें) जें अरिष्ट सांगितलें असेल त्याबद्दल गोप्रसवशान्ति आणि (अनिष्ट) नक्षत्राचि शान्ति (अशा दोन) शान्त्या कराव्या. धननाशादि अरिष्ट असल्यास शान्ति करण्याचें कारण नाहीं. मूळ, आश्र्लेषा, ज्येष्ठा व मघा-या नक्षत्रांवर जन्म झाला असल्यास चौथ्या पादीं जरी पित्याला अनिष्ट नसतें तरी गोप्रसवशान्ति करावी. अश्विनी, रेवती, पुष्य व चित्रा या नक्षत्रांवर जन्म झाला असतां जरी नक्षत्रशान्ति करण्याचें कारण नाहीं, तरी गोप्रसवशान्ति करावी. त्यासंबंधानें,
’अस्य शिशोः अमुक दुष्टकालोत्पत्ति सूचितारिष्ट निवृत्त्यर्थं गोमुखप्रसवशान्तिं करिष्ये’
असा संकल्प करुन गणेशपूजन केल्यावर, ’अङ्गादङ्गाद्०’ या मंत्रानें बालकाची टाळु हुंगावी. प्रयोगांतच पुण्याहवाचन करण्यास कौस्तुभ आणि मयूख या ग्रंथात सांगितलें आहे. ज्यांच्या त्यांच्या शाखांत सांगितल्याप्रमाणें पुण्याहवाचन करुन बालकाच्या टाळूचें अवघ्राण (हुंगणें) केल्यानंतर, ’अस्य गोमुखप्रसवस्य पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु’ हें एकच वाक्य तीन वेळां उच्चारावें. ऋत्विजांनीं (होमहवानादि कर्में करणारे ब्राह्मण) प्रतिवचन द्यावें. शाखेला सांगितलेलें पुण्याहवाचन न करण्याबद्दल कमलाकरांत सांगितलें आहे. नान्दीश्राद्ध करुं नये. अग्नीची स्थापना केल्यावर, एका पीठावर (जागेवर) अधिदेवतांवाचून फक्त नवग्रहांची मांडणी करुन अन्वाधान करावें. आज्यभागापर्यंतचें कर्म संपल्यावर, ’आपोहिष्टा०’ या तीन ऋचांनीं आप (पाणी) देवतांचा ’अप्सु मे सोमो.’ या गायत्रीनें व ऋचेनें --दहीं,मध व तूप-यांचें मिश्रण करुन, प्रत्येक ऋचेच्या आठ आहुती याप्रमाणें होम करावा. ’तद्विष्णो०’ या ऋचेनें दहीं, मध व तूप यांचें मिश्रण करुन, त्याच्या आठ आहुतींनीं विष्णुदेवतेचा होम करावा ’अक्षीभ्यां०’ या सूक्तानें दहीं, मध व तूप यांचें मिश्रण करुन, प्रत्येक ऋचेच्या आठ आहुतींनीं यक्ष्महादेवतेचा होम करावा. दहीं, मध व तूप यांच्या आठ आठ आहुतींनीं नवग्रहांचें हवन करावें, व बाकी राहिलेल्या मिश्रणाचा स्विष्टकृत् होम करावा, असें मयूखांत सांगितलें आहे. कमलाकरांत---दहीं, मध व तूप यांच्या मिश्रणानें चार वेळा आपदेवतांचा, एकदां विष्णूचा, ’अक्षीभ्याम्०’ या सूक्तानें प्रत्येक ऋचेच्या आठ आठ आहुतींनीं यक्ष्महादेवतेचा, एकेक आहुतीनें नवग्रहांचा व शेषमिश्रणानें स्विष्टकृत---असे होम करण्यास सांगितलें आहे. तुपाचा होम झाल्यानंतर एका कुंभांत विष्णु आणि वरुण यांच्या प्रतिमांची पूजा करावी. विष्णु, वरुण व यक्ष्महा या तीन देवतांची पूजा करावी, असें मयूखांत म्हटलें आहे. त्यानंतर अन्वाधानाला अनुसरुन होम करावा. असा हा याचा थोडक्यांत विस्तार समजावा. बाकीचा प्रयोग शान्तिसंबंधाच्या ग्रंथांत पहावा. याप्रमाणेंच पुढें सुद्धां--देवता, द्रव्य, आहुतिसंख्या, निमित्त व फल---हीं मात्र लिहिलीं आहेत. त्याचा विस्तार इतर ग्रंथांत पाहावा.