तीस कृच्छ्रांचा एक अब्द, एक कृच्छ्र जो बारा दिवसांनीं साध्य होतो तो येणेंप्रमाणें:-पहिल्या दिवशीं एकभुक्त राहून, मध्यान्हकाळीं हविष्यान्नाचें सव्वीस घांस खावेत. दुसर्या दिवशीं नक्त करुन बावीस घास खावेत. तिसर्या दिवह्सीं कोणापाशीं न मागतां मिळाल्यास चोवीस घांस खावेत. चौथ्या दिवशीं उपास करावा. याला ’पाद-कृच्छ्र’ असें म्हणतात. याच्या तिप्पटीचा ’प्राजापत्यकृच्छ्र’ होतो. पहिल्या दिवशीं एकभुक्त, दुसर्या दिवशीं नक्त, तिसरा व चौथा या दोन्ही दिवशीं अयाचित भोजन आणि पांचवा व सहावा या दोन दिवशीं उपवास, याला ’अर्धकृच्छ्र’ म्हणतात, (तद्वतच) तीन दिवस अयाचित भोजन आणि तीन दिवस उपास यालाही ’अर्धकृच्छ्र’च म्हणतात. पहिल्या दिवशीं एकभुक्त, दुसर्या दिवशीं अयाचित व तिसर्या दिवशीं उपास-असें लागोपाठ तीनदां केलें म्हणजे ’पादोनकृच्छ्र’ होतो. नऊ दिवस जेवणाचे झाल्यावर घांसांचा नियम सोडून, हातांत राहील इतक्या अन्नाचें जें जेवण करणें त्याला ’अतिकृच्छ्र’ हें नांव आहे. एक घांस अन्न किंवा फक्त प्राण राहाण्यापुरतें दूध एकवीस दिवस जें पिणें त्याला ’कृच्छ्रातिकृच्छ्र’ म्हणतात. एक दिवस कुशोदक मिसळलेल्या पंचगव्याचें प्राशन आणि एक दिवस उपास याला ’द्वैरात्रिक सांतपनकृच्छ्र’ म्हणतात. एक दिवस पंचगव्य आणि एक दिवस कुशोदक असें लागोपाठ सात दिवस करण्यास ’महासान्तपन’ म्हणतात. तीन दिवसपर्यंत पंचगव्यमिश्रित भोजन (अशन) करण्याला ’यतिसान्तपन’ म्हणतात. पहिल्या दिवशीं तापवलेलें दूध, दुसर्या दिवशीं तापवलेलें तूप, तिसर्या दिवशीं तापवलेलें पाणी व पुढें तीन दिवस उपास याला ’तप्तकृच्छ्र’ म्हणतात. अथवा-तापलेलें दूध वगैरे तीन दिवस पिऊन, चौथ्या द्विअशीं उपास करण्याला ’तप्तकृच्छ्र’ म्हणतात. बारा दिवसांच्या उपासाला ’पराककृच्छ्र’ म्हणतात. शुद्ध प्रतिपदेपासून पुढें रोज मोराच्या अंडयाएवढा घांस वाढवीत नेऊन पौर्णिमेला पंधरा घांस-मध्यें एखाद्या तिथीचा क्षय असल्यास पौर्णिमेला चौदा (घांस) होतात व तिथीची वृद्धि असल्यास सोळा (घांस) होतात. कृष्णपक्षांत रोज एकेक घांस कमी करुन, अमावास्येला उपास करणें, हें जें एक महिन्यानें साध्य होणारें (व्रत) तें ’यवमध्यचान्द्रायण’ होय . कृष्णपक्षांतल्या प्रतिपदेला चौदा घांस खाऊन, एकेक घांस कमी करीत अमावास्येला उपास करणें, आणि पुढें शुक्लपक्षांत एकेक घांस रोज वाढविणें असें जें कृष्णपक्षांत आरंभ करुन शुद्धांत पूर्ण करणें, तें ’पिपीलिकामध्यचान्द्रायण’ होय. कृच्छ्रचान्द्रायणांत त्रिकालस्नान करणें, घांसांचें अभिमंत्रण करणें वगैरेबद्दलचा विधियुक्त प्रयोग प्रायश्चित्तप्रकरणांत पाहावा. अतिकृच्छ्रादिकांचें लक्षण प्रसंगवशात् येथें सांगितलें. अब्दाची गणना प्राजापत्यकृच्छ्रांनींच करावी.