आदल्या दिवशीं उपास करुन हातांत पवित्रकें घालून प्राणायाम करावा. नंतर देशकालादिकांचा उच्चार करुन, ’ममाप्रजत्वप्रयुक्तपैतृकऋणापाकरणपुन्नामन्रकत्राणद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं शौनकोक्तविधिना पुत्रप्रतिग्रहं करिष्ये तदङ्गत्वेन स्वस्तिवाचनमाचार्यवर्णं विष्णुपूजनमत्रदानं च करिष्ये ।’ असा संकल्प करावा व मग आचार्याची मधुपर्कानें पूजा केल्यावर विष्णूची पूजा करावी. ब्राह्मणादिकांचा भोजनसंकल्प करावा. त्यानंतर आचार्यानें, ’यजमानानुज्ञयापुत्रप्रतिग्रहाङ्गत्वेन विहित होमं करिष्ये’ असा संकल्प करुन अग्नि मांडावा. नंतर ’चाक्षुषी आज्येनेत्यन्ते सकृदग्निं ।
'सूर्यासावित्रीम् षडवारं चरुणा अग्निं वायुं सूर्यं प्रजापतिंचाज्येन शेंषेणस्विष्टकृतमित्यादि'
असें अन्वाधान करुन, अठ्ठावीस मुठी तांदूळ मंत्ररहितच भांडयांत ठेवावेत, आणि तसेंच ’आज्योत्पवनांतं’ कर्म करावें. नंतर दात्याकडे जाऊन त्याला ’पुत्र दे’ अशी याचना करावी. दात्यानें देशकालादिकांचा उच्चार करुन, ’श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं पुत्रदानं करिष्ये’ असा संकल्प केल्यावर गणपतिपूजन करावें. त्यानंतर पुत्र घेणाराची यथाशक्ति पूजा करुन
’येयज्ञंनेतिपञ्चानांनाभानेदिष्टो मानवोविश्वेदेवतास्त्रिष्टुप्
पञ्चम्यनुष्टुप्पुत्रदाने विनियोगः । ’ये यज्ञेनेतिये०’
या पांच ऋचा म्हटल्यावर
’इमं पुत्रं तव पौत्रिकऋणापाकरणपुन्नामनरकत्राणसिद्धयर्थं
आत्मनः श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं तुभ्यमहं सम्प्रददे न मम प्रतिगृह्वातु पुत्रं भवान्’ --
असें म्हणून, मुलाला दत्तक घेणार्याच्या हातावर पाणी सोडावें. दत्तक घेणार्यानें ’देवस्यत्वेति०’ या मंत्रांनीं दोन हातांनीं पुत्राला घेऊन आपल्या मांडीवर बसवावें, आणि ’अङ्गादङ्गास्तंभवसीति०’ या मंत्रानें त्याची टाळू हुंगावी. नंतर त्याला वस्त्रालंकार कुंडलादिकांनीं अलंकृत करुन गीतवाद्यांच्या घोषांत स्वस्तिमंत्र म्हणत, पुत्राला आपल्या घरीं आणावें. हातपाय धुऊन आचमन करावें. आचार्याच्या उजवीकडे आपण बसावें व आपल्या उजव्या बाजूस बसलेल्या आपल्या भार्येच्या मांडीवर पुत्राला बसवावें. त्यानंतर आचार्यानें बहींच्या आसादनापासून (बर्हि-अग्नि, दर्भ) तुषाच्या भागाच्या-आज्यभागाच्या शेवटापर्यंतचें कर्म करावें. नंतर भात घेऊन
’ यस्त्वाहृदेतिद्वयोरात्रयोवसुश्रुतोग्निस्त्रिष्टुप पुत्रप्रतिग्रहांङ्गहोमे विनियोगः । यस्त्वाहृदेति०’
या दोन ऋचांनीं, त्या सर्व भाताचें एकच अवदान (सबंद एक गोळा) करुन, होम संपवावा. यजमानानें ’अग्नय इदं न मम’ असें म्हणावें. व नंतर
'तुभ्यमग्रेपर्यवहन्सूर्यासावित्रीसूर्यासावित्र्यनुष्टुप्। सूर्यासावित्र्या इदं० ।
सोमोददतिपंचांनासूर्यासावित्री सूर्यासावित्री अनुष्टुभौ जगत्रिष्टुवनुष्टुप् ।'
अशा पांच ऋचांनीं होम करावा. पांचही ऋचांनंतर’सूर्यासावित्र्या इदं० ।’ असें म्हणावें. याप्रमाणें भाताच्या सात आहुती देऊन व्यस्त (व) समस्त व्याहृतिमंत्रांनीं हवन करावें. स्विष्टकृत होम पुरा करुन, आचार्याला गाय दान द्यावी आणि ब्राह्मणांना भोजन द्यावें.