मागें सांगितल्याप्रमाणें गर्भाधानसंस्कारादि करुनही जर गर्भोत्पत्ति होण्याचा अभाव दिसला, किंवा मुलें होऊन मरत असलीं तर संततीला प्रतिबन्धक अशीं जीं पिशाचें, त्यांचा उपद्रव नाहींसा करण्यासाठीं---नारायणबलि व नागबलि---हे करावेत. नारायणबलि शुद्ध एकादशी, पंचमी अथवा श्रवण नक्षत्र यांवर करावा; कारण, हें कर्म करण्यास दुसरा काल सांगितलेला नाहीं. त्याचा प्रयोग परिशिष्ट व स्मृत्यर्थसार यांच्या अनुरोधानें कौस्तुभांत जो सांगितलेला आहे, तो असाः--शुद्धपक्षांत एकादशीच्या दिवशीं नदीतीरीं किंवा देवळांत---तिथि, वार, वगैरेंचा उच्चार करुन ’मदीयकुलाभिवृद्धिप्रतिबन्धकप्रेतस्यप्रेतत्त्वनिवृत्यर्थं नारायणबलिं करिष्ये’ असा संकल्प करावा, आणि दोन कुंभांची (मडकीं) यथाविधि स्थापना करुन, त्यांवर ज्या सुवर्णादिकांच्या दोन प्रतिमा ठेवाव्या, त्यांत विष्णु व वैवस्वत यम यांना बोलावणें करुन, विष्णूची पुरुषसूक्तानें व यमाची ’यमाय सोमं०’ या मंत्रांनीं अनुक्रमें षोडशोपचारें पूजा करावी. कोणी कोणी दोहोंच्या ठिकाणीं पांच कुंभ मांडून, त्यावर--ब्रह्मा, विष्णु, शिव, यम आणि प्रेत यांची पूजा करतात. कलशाच्यापुढें एक रेघ ओढून, दक्षिणेकडे टोकें केलेल्या दर्भांवर ’शुन्धन्तां विष्णुरुपी प्रेतः’ अशा उच्चारानें दहा ठिकाणीं उत्तरेकडून दक्षिणेकडे पाणी द्यावें व--मध, तूप आणि तिल यांच्या मिश्रणाचे दहा पिण्ड ’काश्यपगोत्र देवदत्तप्रेत विष्णुदैवत अयं ते पिण्डः’ असा उच्चार केल्यावर दक्षिणाभिमुख होऊन, अपसव्यानें डावा गुडघा खालीं वांकवून पितृतीर्थानें (अंगठा व तर्जनींतला भाग) पिण्ड द्यावा. नंतर गंधादिकांनीं पूजा करुन, पिण्डाचे प्रवाहणापर्यंतचें कर्म झाल्यावर त्याचें विसर्जन करावें. त्याच रात्रीं ’श्र्व: करिष्यमाणश्राद्धे क्षणः क्रियताम्’ असा उच्चार करुन एक, तीन किंवा पांच ब्राह्मणांना आमंत्रण द्यावें’ नंतर उपोषित राहून जागरण करावें. दुसर्या दिवशीं मध्याह्नकाळीं विष्णूचें पूजन करुन, विष्णुरुपी प्रेत अथवा-विष्णु, ब्रह्मा, शिव, यम व प्रेत यांच्या नांवानें एकोद्दिष्टविधीनें पाय धुण्यापासून तृप्तिप्रश्नापर्यंत कर्म करुन रेखाकरणादि कर्म मनांत उच्चारुन एकान्तांत करावें. ’विष्णवे ब्रह्मणे शिवाय सपरिवारं यमाय’ असा उच्चार केल्यावर चार पिण्ड नाममंत्रानें द्यावे. विष्णुरुपप्रेताचें ध्यान करुन, ’काश्यपगोत्र देवदत्त विष्णुरुप अयं ते पिण्डः’ असें म्हणून पांचवा पिण्ड द्यावा. त्यानंतर पूजा, प्रवाहण वगैरे आटपल्यावर, ब्राह्मणांनीं आचमन केलें म्हणजे त्यांना दक्षिणादिक देऊन संतुष्ट करावें. त्या ब्राह्मणांतलाच एक गुणवान् ब्राह्मण पाहून त्याला प्रेताच्या नांवानें वस्त्रें, अलंकार वगैरे दिल्यावर ’प्रेताला तिलोदकाचा अंजली द्या’ असें ब्राह्मणांना सांगावें. ब्राह्मणांनीं हातांत पवित्रकें घालून---दर्भ, तीळ व तुळशी यांनीं युक्त असा तिलाञ्जलि ’प्रेताय काश्यपगोत्राय विष्णुरुपिणे अयं तिलाञ्जलिः’ असें म्हणून द्यावा. ’अनेन नारायणबलिकर्मणा भगवान् विष्णुः इमं देवदत्तं प्रेतं शुद्धं अपापमर्हं करोतु’ असें ब्राह्मणांकडून बोलवावें. त्यानंतर ब्राह्मणांचें विसर्जन करुन, स्नान व भोजन हीं करावींत. निर्णयसिंधूंत यावांचून आणखी जो विशेष विधि सांगितला आहे तो असा:-पांच कुंभ करुन त्यांत विष्णु, ब्रह्म, शिव, यम व प्रेत या पांच देवतांची पूजा करावी. पहिल्या चार देवतांच्या प्रतिमा अनुक्रमें सोनें, रुपें, तांबें व लोखंड यांच्या करुन पांचवी दर्भाची करावी. अग्नीची स्थापना करुन त्यावर शिजवलेल्या भातानें नारायणाला पुरुषसूक्तानें सोळा आहुति द्याव्या. हें हवन झाल्यावर दहा पिण्ड द्यावे व पुरुषसूक्तानें अभिमंत्रित केलेल्या शंखांतल्या पाण्यानें एकेक ऋचा म्हणून---प्रेताचें तर्पण करावें. विष्णु वगैरे चार चार देवतांना बलि द्यावे. ’एकोद्दिष्टविधिना श्राद्धपञ्चकं करिष्ये’ असा संकल्प करुन दुसर्या दिवशीं पांच ब्राह्मणांची पाद्यादिक पूजा केल्यावर पिण्डदानापर्यंत सर्व कर्म करावें व नंतर तर्पण करावें. निर्णयसिंधूंत एवढाच विधि विशेष आहे व बाकीचा सारा वरच्याप्रमाणेंच समजावा. .