पुत्राला पाळण्यांत घालण्याला बारावा दिवस व कन्येला तेरावा दिवस हे शुभ होत. या दिवसांबद्दल नाक्षत्रविचार करण्याचें कारण नाहीं. या दिवसांवांचून इतर दिवशीं जर मूल पाळण्यांत घालायचें असलें तर शुभकालाचा विचार करणें हें योग्य आहे. तीन उत्तरा, रोहिणी, हस्त, अश्विनी, पुष्य, रेवती, अनुराधा, मृग, चित्रा, पुनर्वसु, श्रवण आणि स्वाति हीं नक्षत्रें असतां शुभवारीं व रिक्तातिथि सोडून इतर तिथींवर चंद्रतारकांचें बल पाहून कुलस्त्रियांनीं बालकाला पाळण्यांत ठेवावें. जन्मल्यापासून एकतिसाव्या दिवशीं किंवा दुसर्या जन्मनक्षत्रीं, अथवा आन्दोलनास (पाळण्यांत घालण्यास) जीं नक्षत्रें सांगितलीं त्या नक्षत्रीं पूर्वाह्नीं किंवा मध्यान्हीं कुलदेवता व ब्राह्मण यांची पूजा करुन मुलाला शंखानें गाईचें दूध पाजावें, असें दुग्धपान सांगितलें आहे. बाळंतिणीनें एक महिना झाल्यावर बुधवार, गुरुवार किंवा सोमवार यांपैकीं कोण्यातरी एक्या वारीं रिक्ततिथिवांचून इतर तिथि असतांना श्रवण, पुष्य, पुनर्वसु, मृग, हस्त, मूळ अथवा अनुराधा यांपैकीं एका नक्षत्रीं पाणवठयावर (जलस्थानीं) जाऊन जलपूजन करावें. या बाबतींत गुरुशुक्रांचे अस्त आणि चैत्र, पौष व अधिक मास हे त्याज्य समजावे. असें हें जलपूजन आहे.