हा सीमन्तोन्नयनसंस्कार गर्भिणीच्या चौथ्या, आठव्या, सहाव्या पांचव्या अथवा नवव्या महिन्यांत करावा. याचा मर्यादा काल पोटांतून गर्भ बाहेर येईपर्यंतचा (गर्भविमोचन) आहे. हा सीमन्तोन्नयनसंस्कार केल्यावांचून जर स्त्री बाळंत होईल तर तिला हातांत पुत्र घेऊन यथाविधि संस्कार करण्याची योग्यता येते. या संस्कारासाठीं पक्ष तिथि, वार व नक्षत्रें--जीं पुंसवनासाठीं (मागें) सांगितलीं तीच प्रशस्त होत. क्वचित् जागीं कृष्णपक्षांतल्या दशमीपर्यंतही घेण्यास सांगितलें आहे. षष्ठी, अष्टमी, द्वादशी, चतुर्दशी व पौर्णिमा या तिथि अडचणीच्या वेळीं घ्याव्या. षष्ठी, अष्टमी आणि द्वादशी या तिथि अनुक्रमें ८,१४ व १० घटका वर्ज्य करुन घ्याव्या. पुरुषनक्षत्रें जर न मिळतील, तर रोहिणी, रेवती व तीन उत्तरा-हीं नक्षत्रें घ्यावींत. उक्त नक्षत्रांचा पहिला व चौथा असे दोन पाद सोडून मधले दोन पाद घेण्यास सांगितले आहे. हा संस्कार एकदांच करावयाला सांगितले आहे. हा गर्भसंस्कार असल्यानें कात्त्यायनांनीं प्रत्येक गर्भारपणांत केला पाहिजे. सीमन्तोन्नयन संस्कार नवर्यानेंच करावा. गर्भाधानसंस्कार जर झाला नसेल, तर प्रायश्चित्तासाठीं ब्राह्मणाला गाय देऊन पुंसवन वगैरे संस्कार करावेत. त्यांत आश्वलायन शाखेच्यांनीं देशकालादिकांचा उच्चार करुन ’ममास्यां भार्याया मुत्पत्स्यमान गर्भस्य गार्भिक बैजिक दोषपरिहा पुंरुपता सिद्धिज्ञानोदयप्रतिरोधपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं पुंसवनमनवलोभनं ममास्या भार्यायां गर्भाभिवृद्धि परिपंथिपिशितरुधिर प्रियालक्ष्मीभूत राक्षसीगण दूरनिरसन क्षमसकल सौभाग्यनिदान महालक्ष्मी समावेशनद्वारा प्रतिगर्भं बीजगर्भं समुद्भवैनोनि बर्हणद्वाराच श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं स्त्रीसंस्काररुपं सीमन्तोन्नयनाख्यं कर्मच तन्त्रेण करिष्ये’ असा संकल्प सीमन्तोन्नयन संस्काराबरोबरच तीन संस्कार करणें असल्यास करावा. या संस्कारांतल्या नान्दीश्राद्धांत ’ऋतुदक्ष’ नांवाचे ’विश्वेदेव’ घ्यावे. पुंसवनसंस्कार जर निराळा करायचा असेल, तर ’पवमान’ नांवाचा ’औपासनाग्नि’ स्थापावा. तिन्ही संस्कार
एकदमच करणें झाल्यास ’मङ्गल’ नांवाचा अग्नि मांडावा. गृह्याग्नि जर विझला असला, तर जे सर्वाधानी असतील त्यांनीं, मागें सांगितल्याप्रमाणें, अग्नि उत्पन्न करावा. पुंसवनसंस्कारांत प्रजापतीचा होम भातानें करावा. सीमन्तोन्नयनसंस्करांत धातृदेवतेला दोन, राकदेवतेला दोन, विष्णुदेवतेला तीन व प्रजापतिदेवतेला एक अशा आहुति द्याव्या. बाकीचा प्रयोग इतर ग्रंथांत पहावा. या प्रत्येक संस्कारांत दहा दहा किंवा तीन तीन ब्राह्मणांना भोजन द्यावें. सामर्थ्य असल्यास शंभरांनाही घालावें. सीमन्तोन्नयनांत जेवण केल्यास, त्याचें प्रायश्चित्त पारिजातग्रंथांत सांगितलें आहे. ब्रह्मौदन, सोमयाग, सीन्मतोन्नयन व जातकर्मसंबंधाचें श्राद्ध यांत जेवणारानें चान्द्रायण प्रायश्चित्त करावें; किंवा ’अराइव०’ या मंत्राचा शंभर जप करावा. हें प्रायश्चित्त --- आधान व ब्रह्मौदनासंबंधाच्या भोजनाप्रमाणेंच सीमन्तभोजनाबद्दलही जाणावें. ’त्या दिवशीं कर्त्याच्या घरीं नुसतें जेवण तेवढें करण्याला प्रायश्चित्त नाहीं,’ असें जें पारिजातांति सांगितलें आहे तें योग्य आहे.