तिसर्या महिन्यांत बालकाला सूर्य दाखवावा. चौथ्या महिन्यांत किंवा अन्नप्राशनसमयीं त्याचें निष्क्रमण (घराबाहेर नेणें) करावें त्याविषयीं शुभकाल :-शुक्लपक्ष व कृष्णपक्षाचे शेवटचे तीन दिवस खेरीजकरुन बाकीचा काळ हे शुभ होत. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, षष्ठी, अष्टमी, अमावास्या व द्वादशी या तिथि वर्ज्य कराव्या. गुरु, शुक्र व बुध हे वार आणि अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, तीन उत्तरा, हस्त, धनिष्ठा, श्रवण, रेवती, पुनर्वसु व अनुराधा हीं नक्षत्रें प्रशस्त होत. हें निष्क्रमण नित्य व काम्य आहे. सूर्यदर्शन व निष्क्रमन यांत नान्दीश्राद्ध कृताकृत (करावें अथवा न करावें) आहे. भूम्युपवेशन म्हणजे बालकाला जमिनीवर ठेवण्याचा जो काल तो पांचव्या महिन्यांत निष्क्रमणाच्या उक्त दिवशीं मंगळाचें बळ पाहून योजावा. सहाव्या, आठव्या, दहाव्या किंवा बाराव्या महिन्यांत अथवा बालक पूर्ण वर्षाचें झाल्यावर त्याचें अन्नप्राशन करवावें. पांचव्या, सातव्या किंवा नवव्या महिन्यांत कन्येचें अन्नप्राशन करावें. अन्नप्राशनाला---द्वितीया, तृतीया, पञ्चमी, सप्तमी, दशमी, व त्रयोदशी या तिथि शुभ होत. बुध, गुरु व शुक्र हे वार शुभ होत. रवि व सोम हेही वार क्वचित् शुभ सांगितले आहेत. अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, तीन उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती हीं नक्षत्रें शुभ होत. कोणी ग्रंथकार जन्म नक्षत्र शुभ असल्याचें सांगतात. भद्रा, वैधृति, व्यतिपात, गण्डअतिगण्ड, वज्र, शूल व परिघ हे योग वर्ज्य करावेत. विष्णु, शिव, चन्द्र, रवि, अष्टदिक्पाल, भूमि, दिशा व ब्राह्मण यांची पूजा करुन, मातेच्या मांडीवर असलेल्या बालकाला सोन्याच्या किंवा काश्याच्या भांडयात दहीं, मध व तूप यांच्या मिश्रणाची खीर सोन्याच्या अलंकारानें युक्त अशा हातानें, मंत्र म्हणून प्राशन करवावी. सूर्यदर्शनापासून अन्नप्राशनापर्यंतचीं जीं कर्में करायचीं, तीं सर्व कर्में शिष्ट जन अन्नप्राशनसमयींच करतात. अन्नप्राशनाबरोबर या कर्मांचे जे प्रयोग ते कौस्तुभांत पहावेत. अन्नप्राशनानन्तरचा विधि-बालकाच्या पुढें सर्व कलाकौशल्याचे पदार्थ, शस्त्रें, वस्त्रें, पुस्तकें वगैरे ठेवून (त्याला सोडून द्यावें व) त्यांवरुन लक्षण पाहावें, बालक पहिल्या प्रथम ज्या वस्तूला स्पर्श करील, त्याच्यावरच पुढें त्याची उपजीविका चालेल. सूर्यदर्शनापासून अन्नप्राशनापर्यंतच्या या संस्कारांविषयीं मलमास व गुरुशुक्रांचे अस्त यांचा दोष नसल्याबद्दलचें जें वचन आहे तें हे संस्कार उक्तकालीं जर केले नाहींत तर आहे असें समजावें; म्हणून सहाव्या महिन्यांत जर अस्तादि दोष असतील, तर हे संस्कार आठव्या महिन्यांत करावेत. याप्रमाणें सूर्यावलोकन, निष्क्रमण, भूम्युपवेशन व अन्नप्राशन या संस्कारांचा निर्णय समजावा.