अग्निहोत्री ब्राह्मणाच्या स्त्रीला जर यमल (जुळें) झालें, तर त्यानें ’मरुत्वत्’ अग्नीला तेरा कपालांचा पुरोडाश अर्पण करावा, अशी जी ऋग्वेदब्राह्मणांत इष्टि सांगितली आहे (ती करावी). अथवा आश्वलायन सूक्तांत सांगितलेला मरुत्याग तेवढाच करावा. आश्वलायनशाखी जर गृह्याग्निधारक असेल, तर त्यानें गृह्याग्नीवर मरुत्चरु करावा. ज्याची बायको अथवा गाय जुळें प्रसवेल त्यानें मरुत् देवतांप्रीत्यर्थ चरु अथवा पूर्णाहुति हीं करावींत असें कारिकाग्रंथांत सांगितले आहे. जो आश्वलायनशाखी गृह्याग्निरहित असेल त्यानें (अशा वेळीं) कात्यायनानें सांगितलेली शान्ति लौकिकाग्नीवर करावी. अग्निहोत्र्यानें
’मम भार्यायमलजननसूचितसर्वारिष्टपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मरुतेष्टया यक्ष्ये’
असा संकल्प करावा आणि अग्निरहितनें
’सग्रहमखां कात्यायनोक्तां शान्तिं करिष्ये’
असा संकल्प करुन, पुण्याहवाचनापासून आचार्यवरणापर्यंतचें कर्म करावें. आठ दिशांना आठ कलशांची विधियुक्त स्थापना करुन, त्यांत उदक घालण्यापासून सर्वौषधी घालण्यापर्यंतचें कर्म झाल्यावर वरुणाची पूजा करावी. आठी कलशांतल्या पाण्यानें नवराबायकोंना अभिषेक करावा. ’आपोहिष्ठा०’ या ३ ऋचा, ’कयान०’ या ५ ऋचा, ’आनःस्तुत०’ या ५ ऋचा, इन्द्रदेवतेच्या ५ ऋचा, ’मोषु० वरुण०’ या ५, ’इदमाप०’ ही एक व ’अपन०’ या अग्निदेवतेच्या ८ इतक्या ऋचांनीं’ वर सांगितलेला दम्पत्याभिषेक करावा. नंतर दंपत्यानें श्वेत वस्त्र धारण करुन चंदन लावल्यावर उत्तराभिमुख होऊन बसावें. पूर्वाभिमुख असलेल्या आचार्यानें अग्नि व ग्रह यांची स्थापना केल्यावर ---
’अपस्तिसृभिराज्यहुतिभिरिन्द्रं सप्तभिर्वरुणं पञ्चमिरप एकयाग्निमष्टाभिराज्यहुतिभिः पूर्वत्राभिषेकार्थमुक्तैश्चतुर्विंशतिमन्त्रैरग्निं सोमं पवमानं पावकं मारुतं मरुतः यमं अन्तकं मृत्युं चैकैकया चर्वाहुत्या नाममन्त्रैः शेषेणेत्यादि’
असे अन्वाधान करावें. मंत्ररहित असे ३६ वेळां निर्वाप (तांदूळ घेणें) करुन, ते तितके वेळां (३६) धुवावेत, व शेवटीं कलशांतल्या पाण्यानें अभिषेक करावा. दासी, म्हैस, घोडी, गाय, हत्तीण यांना जरी (यमल) जुळीं झालीं तरीही शान्ति करावी. ग्रहांचे उत्पात, घुबड, कपोत, गिधाड, ससाणा हीं घरांत आलीं असतां आणि खांबाला अंकुर फुटणें, वारुळ उत्पन्न होणें, आसन, पलंग, यान वगैरे भंग होणें, पल्लिपतन, सरठारोहण, छत्रध्वजांचा नाश वगैरे उत्पात झाले असतांहि शान्ति करावी, असें कात्त्यायनाचें मत आहे. साग्निक कात्यायंनशाखीयांनीं, ही शान्ति आपल्या गृह्याग्नीवर करावी. जे कोणी अग्निरहित कात्यायनशाखेचे असतील त्यांनी लौकिकाग्नीवर (ही शान्ति) करावी. अशी ही यमलजननादि शान्ति आहे.