स्त्रीला बाळंत होण्यास जर त्रास होऊं लागला, तर ऋग्विधान ग्रन्थांत सांगितलेल्या ’प्रमन्दिने०’ या ऋचेचा अथवा ’विजिहीर्ष्व०’ या सूक्ताचा जप करावा किंवा या मंत्रांनीं मंतरलेलें (अभिमंत्रित) पाणी प्यावें (बाळंत होणारणीला पिण्यास द्यावें) म्हणजे सुलभप्रसूति होते. सुलभप्रसूतीचा मंत्र:-
’हिमवत्त्युत्तरे पार्श्वे सुरभानाम यक्षिणी ।
तस्याःस्मरणमात्रेण विशल्या गर्भिणी भवेत् ॥
ॐ क्षीं ॐ स्वाहा’
या मंत्रानें तिळाचें तेल शंभर किंवा हजार वेळां दुर्वांकुरांनीं मंत्रून थोडें प्यावें (पिण्यास द्यावें) व थोडें गर्भस्थानाला (योनींत) लावावें. चांगल्याप्रकारें (चोपडून) लावल्यानें लवकर आणि सुखानें प्रसूति होते. गाईच्या तोंडाचा अस्थीचा सांगडा सूतिकागृहावर (बाळंत होण्याच्या जागेवर) ठेवल्यानेंही सुलभप्रसूति होते. वेळू व निंबवृक्ष (कडुनिंब) यांची साल , तुळशीची मुळी, कवठीचें पान आणि कण्हेरीचें बीं - या पांची वस्तु समभाग घेऊन म्हशीच्या दुधांत वांटाव्या आणि त्यांत थोडें तिळाचें तेल घालून त्याचा योनीला लेप करावा म्हणजे त्वरित प्रसूति होते.