नांवाचे जे चार प्रकार आहेत, ते येणेंप्रमाणें :- देवतांसंबंधीं, महिन्यासंबंधीं, नक्षत्रासंबंधीं आणि व्यवहारासंबंधीं. अमुक देवतेचा भक्त अशा अर्थीं जें नावं तें देवतेसंबंधाचें पहिल्या प्रकारचें. दुसरा प्रकार महिन्यासंबंधीं नांवाचा. वैकुण्ठ, जनार्दन, उपेन्द्र, यज्ञपुरुष, वासुदेव, हरि, योगीश, पुण्डरीकाक्ष, कृष्ण, अनंत, अच्युत व चक्री हीं बारा नांवें चैत्रादि (बारा० महिन्यांसंबंधानें जाणावींत. या ठिकाणीं जे बारा महिने घ्यायचे ते शुद्धपक्षाच्या आरंभापासून वद्यपक्षाच्या अखेरीपर्यंतच्या चान्द्रमासाचे घ्यावेत. ज्या नक्षत्रावर जन्म झाला असेल त्या नक्षत्राच्या वाचक शब्दाचा ’जातः’ या अर्थीं तद्धित प्रत्यय करुन सिद्ध झालेलें जें नांव तें तिसर्या प्रकारचें नक्षत्रनाम. जसें :- अश्वयुक्त ( अश्विनी नक्षत्रावर जन्मलेला), आपभरण, कार्तिक, रौहिण, मार्गशीर्ष, आर्द्रक, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्वाफाल्गुन, उत्तराफाल्गुन, हस्त, चैत्र, स्वाति, विशाख, अनुराध, ज्येष्ठ, मूलक, पूर्वाषाढ, उत्तराषाढ, अभिजित, श्रवण, धनिष्ठ, शतभिषक्, पूर्वाप्रोष्ठपाद, उत्तराप्रोष्ठपाद आणि रवैत. चू, चे, चो, ला अश्विनी वगैरे जें ज्योतिषग्रंथांत अवकहडाचक्र सांगितलें आहे, त्याला अनुसरुन अश्विनी नक्षत्रांतल्या चार चरणांत जन्मलेल्या मुलाचें नांव---चूडामणि, चेदीश, चोलेश, लक्ष्मण वगैरे नक्षत्रांसबंधीं नांव ठेवण्यास कांहीं ग्रंथकार सांगतात; परंतु असें नांव ठेवण्याचें श्रौतग्रंथादिकांना संमत नाहीं. जे सांख्यायन आहेत, ते तर कृत्तिकानक्षत्रावर जन्मलेल्याचें ’अग्निशर्मा’ असें नक्षत्रदेवतेसंबंधाचें नांव ठेवतात. याप्रमाणेंच कात्यायनशाखीसुद्धां नक्षत्रदेवतेसंबंधाचें नांव ठेवतात. नक्षत्रसंबंधाचें नांव---माता, पिता गुरु वगैरेंना नमस्कार करण्याच्या कामीं येत असून तें मौंजीबन्धनापर्यंत जरी गुप्त असावें, तरी तें फक्त माता व पिता यांसच माहीत असावें. चौथ्या प्रकारचें जें व्यावहारिक नांव तें कवर्गादि पांच वर्गांतल्या मृदुव्यंजनांपैकीं ज्याचा वर्ण आरंभीं आहे असे किंवा हकार ज्याच्या आरंभीं आहे असें असावें. त्याच्यामध्यें य र ल अथवा व पैकीं एक वर्ण असावा. अंतीं ऋ अथवा लृ नसून विसर्ग असावा. बाप, आजा किंवा पणजा यांच्या नांवांपैकीं कोणाचें तरी तें नांव वाचक असावें व शत्रूच्या नांवाचें वाचक नसावें. तें नांव तद्धितप्रत्ययान्त नसून कृत्प्रत्ययान्त असावें. पुत्राचें सम अक्षरांचें व मुलीचें विषम अक्षरांचें असावें. उदाहरण---देव, हरि वगैरे. वर सांगितलेलीं लक्षणें नसल्यास पुत्राचें सम अक्षरांचें व कन्येचें विषम अक्षरांचें हें एकच लक्षण असावें. उदाहरणार्थ--रुद्र, राजा इत्यादि. येथें अक्षर म्हणजे स्वर समजावा. व्यंजनांच्या संख्येचा नियम नाहीं. या बाबतींतला विशेष म्हणजे मुलाच्या प्रतिष्ठेची इच्छा करणारानें दोन अक्षरीं नांव ठेवावें व ब्रह्मतेजाची इच्छा करणार्यानें चार अक्षरीं ठेवावें; पण शेवटीं लकार व वकार नसावेत. आपस्तंब व हिरण्यकेशी सूत्रांत प्रातिपदिकानें आरंभ होणारें व धातूनें शेवट होणारें किंवा उपसर्गयुक्त नांव ठेवावें असा विशेष सांगितला आहे. उदाहरणार्थ, हिरण्यदा, सुश्री वगैरे. ब्राह्मणाचें व्यावहारिक नांव ’शर्मा’ किंवा ’देव’ या पदांनीं अंत होणारें असावें, क्षत्रियाचें ’वर्मा’अथवा ’राज’ या पदानें अंत होणारें असावें, वैश्याचें ’गुप्त’ अथवा ’दत्त’ या पदांनीं अंत होणारें असावें आणि शूद्राचें ’दास’ पदानें अंत होणारें असावें. व्यावहारिक नांव राजवाडा वगैरेंनाही ठेवावें. देऊळ, हत्ती, घोडा, झाड, विहीर, डबकें, बाजारांत विकण्याचे सर्व पदार्थ, चिन्हें, स्त्री, पुरुष, काव्य, कवि, पशु, राजवाडा, यज्ञ इत्यादिकांचींही नांवें वर सांगितल्याप्रमाणें ठेवण्यास वचन आहे.