गर्भस्त्राव होत असतांना तो बंद करण्यास, सोन्याचें जानवें दान करण्यास जें महार्णवांत सांगितलें आहे, तें (गर्भारशी) स्त्रीनें दान करावें. शुभ दिवशीं स्त्रीनें आचमन करुन देशकालादिकांचा उच्चार करावा आणि---
’मम गर्भस्त्राव निदान सकलदोष परिहारद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं
व युपुराणोक्तं सुवर्ण यज्ञोपवीतदानविधिं करिष्ये’
असा संकल्प करुन, एका पलाचें, अर्ध्या पलाचें, पाव पलाचें किंवा यथाशक्ति सोन्याचें जानवें करुन त्याच्या गांठीच्या जागीं मोतीं लावावें आणि वज्रमणि लावलेली रुप्याची उत्तरी करुन त्या दोहोंना पंचगव्यांत बुडवून त्यांचें प्रक्षालन करावें. तांब्याच्या भांडयांत द्रोणभर दहीं घालून त्यांत द्रोणभर तूप घालावें आणि त्यावर तीं दोन्ही (जानवें व उत्तरीय) ठेवावींत. नवर्यानें किंवा ब्राह्मनानें गायत्रीमंत्र म्हणून गन्धादिकांनीं त्याची पूजा करावी. आठ गुंजा म्हणजे एक मासा, दहा मासे म्हणे एक सुवर्ण, चार सुवर्ण म्हणजे एक पल, त्याच्या चौपट म्हणजे एक कुडव, त्याच्या चौपट म्हणजे एक प्रस्थाढक व त्याच्या चौपट म्हणजे एक द्रोण. दहीं व तूप हीं एकेक द्रोण घेण्यास जर ऐपत नसेल, तर तीं यथाशक्ति घ्यावींत. तूप व मध यांत मिसळलेल्या तिळांचा गायत्रीमंत्रानें किंवा व्याहृतिमंत्रानें ब्राह्मणानें १०८ होम करावा. होमांत नवर्यानें अथवा स्त्रीनें त्याग करावा (आहुती द्याव्या). होम करणार्या ब्राह्मणाची वस्त्रादिकांनीं पूजा करावी व त्या पूर्वाभिमुख ब्राह्मणाला उत्तराभिमुख स्त्रीनें जें दान करावें तें येणेंप्रमाणें:-
’उपवीतं परिमितं ब्रह्मना विधृतं पुरा ।
भवनौकास्य दानेन गर्भं सधारये ह्यहम् ॥’
हा मंत्र म्हणून ब्राह्मणाचें नांव आणि गोत्र यांचा उच्चार करावा आणि,
’ताम्रपात्रस्थदध्याज्यरंस्थं सुपूजितं सोत्तरीयकमिदं यज्ञोपवीत
गर्भस्त्रावनिदानदोषपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं तुभ्यमहं संप्रददे न मम । प्रतिगृह्यताम् ।’
असें म्हणून दान करावें. ब्राह्मणानें ’प्रतिगृह्वामि’ असें म्हणून (यज्ञोपवीताचें) दान घ्यावें. नंतर ब्राह्मणाला यथाशक्ति दक्षिणा देऊन, इतरांनाही यथाशक्ति दक्षिणा द्यावी आणि दान घेणार्याला पोंचवितांना नमस्कार व प्रार्थना हीं करावींत. त्यानंतर ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन, सर्व कर्म देवाला अर्पण करावें. हें जें दान करावयाचें तें बालहत्त्येबद्दल प्रायश्चित्त करुन नंतर करावें; कारण, ’जी स्त्री विष घालून बालकाला मारत्ये तिच्या गर्भाचा स्त्राव होतो’ असें वचन आहे. दुसर्या ग्रंथांत तर सोन्याच्या गाईचें दान व हरिवंशाचें श्रवण---हीं केल्यानंतर तुपानें भरलेला तांब्याचा कलश दान करावा वगैरे दानें सांगितलीं आहेत.