वरील दानकर्मानंतर हातांत नारळ घेऊन ज्योतिष्याची पूजा करावी. त्याच्याकडून जन्मलग्नींच्या शुभाशुभ ग्रहांचा निर्णय समजावून घेऊन, प्रतिकूल ग्रह असतील ते अनुकूल होण्यासाठीं त्यांचीं दानें करावींत, किंवा ग्रहांच्या मंत्रांचा जप व शांतिसूक्तादिकांचा पाठ करण्यासाठीं ब्राह्मणांची योजना करावी. नंतर नालच्छेदन करवून सुवर्णयुक्त पाण्यानें बालकाच्या मातेचा उजवा स्तन धुऊन, तिला मुलाला पाजायला सांगावें, व त्यावेळीं ’इमां कुमारं’ वगैरे मंत्र ब्राह्मणांनीं म्हणावेत. जातकर्मापासून अन्नसंस्काराच्या कर्मापर्यंतचा होम आश्वलायनशाखीयांनीं करावा अथवा करुं नये. होम करणें असल्यास जातकर्माङ्गभूत नान्दीश्राद्धाच्या शेवटीं ’जातकर्मांगहोमं करिष्ये’ असा संकल्प करुन लौकिकाग्नि मांडावा. अन्वाधानापासून आज्यभागापर्यंतचें कर्म संपल्यावर--अग्नि, इन्द्र, प्रजापति, विश्वेदेव व ब्रह्मा-या देवतांसाठीं तुपानें होम करावा. त्यानंतर मध, तूप वगैरेंच्या प्राशनापासून टाळू हुंगण्याच्या कर्मापर्यंतचें कर्म झाल्यावर, स्विष्टकृत् वगैरे कर्म करावें असा याचा क्रम आहे. भिन्नशाखीयांनीं आपापल्या गृह्यसूत्रांप्रमाणें होमादि करावींत.