हा वाढदिवसाचा विधि (बालक) एक वर्षाचें होईंपर्यंत दर महिन्याला त्याच्या जन्मतिथीला करावा व एकवर्षानंतर दरवर्षीं त्याच्या जन्मतिथीलाच करावा. तिथि जर दोन दिवशीं असेल, तर ज्या दिवशीं जन्मनक्षत्रयोग असेल तो दिवस घ्यावा. दोन्ही दिवशीं जर जन्मनक्षत्रयोग असला किंवा नसला तर सूर्योदयीं दोन मुहूर्ताहून अधिक तिथि असणारा दिवस घ्यावा. दोन मुहूर्तांहून कमी तिथि असल्यास आदला दिवस घ्यावा. जन्माचा महिना अधिकाचा जरी असला तरी वार्षिक वर्धापनविधि (वार्षिक वाढदिवसाचा विधि) शुद्ध मासांतच करावा. अधिकमासीं करुं नये. या वर्धापनविधीचा प्रयोग थोडक्यांत पुढीलप्रमाणें आहे :-
’आयुरभिवृद्धयर्थं वर्षवृद्धिकर्मकरिष्ये’
असा संकल्प केल्यावर अंगाला (वाटलेले) तीळ लावून (थंड) पाण्यानें स्नान करावें. कपाळाला गन्ध लावल्यावर गुरुची पूजा करुन, तांदुळाच्या राशीवर देवतांचे पूजन करावें. या पूजेच्या सुरवातीला ’कुलदैवतायै नमः’ या मंत्रानें कुलदेवतेला आवाहन करुन---जन्मनक्षत्र, ,मातापिता, प्रजापति, सूर्य, गणपति, मार्कण्डेय, व्यास, परशुराम, राम, अश्वत्थामा, कृपाचार्य, बलि, प्रल्हाद, हनुमान, विभीषण आणि षष्ठीदेवता यांचीं नांवें उच्चारुन त्यांचें आवाहन केल्यावर त्यांची पूजा करावी. षष्ठीदेवतेला दहींभाताचा नैवेद्य द्यावा. पूजेनन्तर जी प्रार्थना करावी ती अशी :-
’चिरञ्जीवी यथा त्वं भो भविष्यामि तथा मुनेरुपवान्वित्तवाञ्श्चैव श्रियायुक्तश्च सर्वदा ॥
मार्कण्डेय नमस्तेस्तु सदाकल्पान्तजीवन । आयुरारोग्यसिद्धयर्थं अस्माकं वरदो भव ॥’
अशा प्रार्थनेनंतर
’जय देवि जगन्मातर्जग । दानन्दकारिणि ।
प्रसीद मम कल्याणि नमस्ते षष्ठिदेवते ॥
त्रैलोक्ये यानि भूतानि स्थावराणि चराणि च ।
ब्रह्मविष्णुशिवैः सार्धं रक्षां कुर्वन्तु तानि मे ॥’
अशी षष्ठिदेवतेची प्रार्थना करावी, व मग तिळ व गूळ यांच्या मिश्रणाचें दूध प्यावें. दूध पिण्याचा मंत्र :-
’सतिलं गुडसम्मिश्रमञ्जल्यर्धमितं पयः ।
मार्कण्डेयाद्वरं लब्ध्वा पिबाम्यायुर्विवृद्धये ॥’
क्वचित् ग्रंथांत---पूजा केलेल्या सोळा देवतांच्या नाममंत्रानें प्रत्येकीं अठठावीस असा तिळांचा होम करण्यास सांगितलें आहे. नन्तर ब्राह्मणभोजन करावें. वाढदिवशीं जे नियम पाळावेत ते येणेंप्रमाणें :--नखकेशांचें छेदन (कांपणें) करुं नये, मैथुन करुं नये, रस्त्यावर जाऊं नये, मांस खऊं नये, कलह करुं नये व हिंसा करुं नये. मृत दिवस (म्हणजे ज्या दिवशीं घरांत कोणी मरतो तो दिवस), जन्मदिवस (घरांत कोणी जन्मतो तो दिवस), संक्रान्ति, श्राद्ध व जन्मदिवस (वाढदिवस) या दिवशीं व अस्पृश्याचा स्पर्श झाल्यास कढत पाण्यानें स्नान करुं नये.