रेवती, आश्र्लेषा व ज्येष्ठा नक्षत्रांच्या शेवटच्या दोन दोन घटका आणि अश्विनी, मघा व मूळनक्षत्रांच्या आरंभींच्या दोन दोन घटका मिळून प्रत्येक चार चार घटकांचें एकेक अशीं तीन नक्षत्रगण्डान्तें आहेत. अश्विनी, मघा व मूळ यांच्या पूर्वार्धांत जंर जन्म झाला, तर पित्याला पीडा होते. रेवती, आश्लेषा व ज्येष्ठा यांच्या उत्तरार्धांत जन्म झाल्यास बालकाच्या मातेला पीडा होते. गण्डान्तावर जन्मलेल्या सर्व बालकांचा त्याग करावा किंवा त्यांचें सहा महिने मुखावलोकन करुं नये, अथवा भक्तियुक्त मनानें सोममंत्रानें बरीच शान्ति करावी. ’अस्यशिशोरेवत्यश्विनीसन्ध्यात्मकगण्डान्तजननसूचितारिष्टीनरासार्थं नक्षत्रगण्डान्तशान्तिं करिष्ये’ असा संकल्प करावा आणि गोमुखप्रसव शान्ति करुन, १६१८ किंवा ४ पलें (एक पल = ४० मासे) वजनाचें कांश्याचें भांडें खिरीनें अथवा दुधानें भरुन, त्यांत लोण्यानें भरलेला शंख ठेवावा व त्यावर चन्द्रबिम्बाची स्थापना करुन ’सोमोडहम्’ असें ध्यान करावें. ’आप्यायस्व०’ या मंत्रानें नंतर चंद्राची पूजा केल्यावर ’आप्यायस्व०’ याच मंत्राचा एक हजार जप करावा. ग्रहमख होम करावा. या प्रसंगीं प्रधानदेवतेचा होम करुं नये. इतर कांहीं ग्रंथांत-तांब्याच्या कलशावरच्यां प्रतिमेंत बृहस्पतीच्या मंत्रानें वागीश्वराची पूजा करुन त्याच्या उत्तरेस चार कुंभांत पंचपल्लवादिक, कुंकू, चंदन, कुष्ट (कोष्टवनस्पति) व गोरोचन ही अर्पण करुन वरुणाची पूजा करावी, असें सांगितलें आहे. आचार्याला शंख व मोतीं यांचें चन्द्रासह दान करावें इतर कांहीं ग्रंथांत-तांब्याच्या पात्रासह वागीश्वराच्या प्रतिमेचें दान करुन आयुष्यवृद्धीसाठीं ’सहस्त्राक्षेण०’ या मंत्राचा जप करावा आणि दहांपेक्षां अधिक ब्राह्मणांना जेवूं घालावें असें सांगितलें आहे.