आई, बापाची आई व बापाची आजी या तिघींचा एक वर्ग; बाप, आजा व पणजा या तिघांचा एक वर्ग; आईचा बाप, आईचा आजा व आईचा पणजा या तिघां सपत्नीकांचा एक वर्ग; असे जे वर्ग आहेत, त्यांतील ’पहिली व्यक्ति जिवंत असल्यास तो सर्व वर्ग सोडावा.’ असा न्याय असल्यानें, ज्याचा बाप जिवंत असेल त्यानें आपल्या अपत्याच्या संस्कारांत मार्तृपार्वण व मातामहपार्वण युक्तच नांदीश्राद्ध करावें. आईचा बाप जिवंत असल्यास मातृपार्वणयुक्तच नांन्दीश्राद्ध करावें. केवळ एकच जर मातृपार्वण असेल, तर नान्दीश्राद्धांत विश्वेदेव आणूं नयेत. तिन्ही वर्गांतील पहिलीं-आई, बाप व आईचाबाप-ही जर जिवंत असतील, तर मुलांच्या संस्कारांत नान्दीश्राद्ध न करणेंच योग्य आहे. दुसरें लग्न, अग्न्याधान, पुत्रेष्टि व सोमयाग--यांत आपल्या संस्कारकर्मांत ’आपला बाप ज्या पितरांना पार्वण देतो त्याच पितरांना पुत्रानें द्यावींत.’ तद्वतच-ज्याची आई व आईचा बाप हीं मेलेलीं असून, बाप जिवंत असेल अशानें-त्यचा बाप ज्यांचा उच्चार करतो त्यांचाच उच्चार आपल्या संस्काराच्या नान्दीश्राद्धांत पुढीलप्रमाणें करावा :-
पितुर्मातृपितामहीप्रपितामह्याः, पितुःपितृपितामहप्र
पितामहाः, पितुर्मातामहमातृपितामहमातृप्रपितामहाः,’
असा उच्चार करुन, पार्वणत्नयाच्या नांवानें नान्दीश्राद्ध करावें. आपल्या मातृपार्वणाच्या व मातामहपार्वणाच्या नांवानें करुं नये. बापा व आजा हे जिवंत असतील तर आपल्या संस्कारत आजाच्या मातृपार्वणाचा जो उच्चार करावा तो असा :-
’पितामहस्य मातृपितामहीप्रपितामह्यः
वगैरे पणजा जिवंत असतांही असेंच करावें. बापाची आई वगैरे जर जिवंत असलीं तर त्या पार्वणाला सोडून द्यावें. ’बाप ज्या पितरांना पार्वणें देतो त्यांनाच पुत्रानेंही द्यावींत’ असा जो वर एक पक्ष सांगितला त्याची व्यवस्था व वर्गाचा पहिला जिवंत असलीं तर त्या पार्वणाला सोडून द्यावें. ’बाप ज्या पितरांना पार्वणें देतो त्यांनाच पुत्रानेंही द्यावींत’ असा जो वर एक पक्ष सांगितला त्याची व्यवस्था व वर्गाचा पहिला जिवंत असेल तर त्या पार्वणाचा लोप करावा, अशी जी द्वारलोपपक्षाची व्यवस्था, ती आपले संस्कार व आपल्या पुत्राचे संस्कार, अशा भेदांनीं व्यवस्थितपणें करावी. याचा अर्थ असा कीं, आपल्या संस्कारांत पित्याचीं पार्वणें द्यावींत व पुत्राच्या संस्कारांत आपलीं द्यावींत. वर सांगितलेल्या दोन पक्षांचा विकल्प ऐच्छिक असून, तो व्यवस्थित नाहीं, असें जसे कांहीं ग्रंथकार सांगतात, तद्वतच ज्याचा बाप मेलेला असून, आई व आईचा बाप हीं जिवंत असतील त्याच्या नान्दीश्राद्धाची एका पितृतर्पणानेंच सिद्धि होते, असें समजावें. समावर्तन संस्कार (सोडमुंज) करणारा जरी बटु असला तरी त्याच्या सोडमुंजींतलें नान्दीश्राद्ध त्याच्या बापानें, बाप नसल्यास थोरल्या भावानें वगैरेंनीं करावें, असें कांहीं ग्रंथकारांचें मत आहे. बापानें मुलाच्या सोडमुंजीच्या वेळीं जें नान्दीश्राद्ध करायचें तें त्यानें आपल्या पितरांच्या नांवानें करावें. बापाचा बाप जिवंत असल्यास, तो संस्कार पुत्राचा असल्यानें द्वारलोपपक्षच योग्य आहे असें वाटतें. बहुधा बाप प्रवासादिकांमुळें जवळ नसल्यास थोरला भाऊ वगैरेंनीं बटूच्या बापाच्या पार्वणांनीं ’माणवकस्य पितुर्मातृपितामहीप्रपितामह्यः’ वगैरे उच्चार करुन नान्दीश्राद्ध करावें. बाप मेलेल्याच्या सोडमुंजींत--चुलता, भाऊ, वगैरेंनीं बटूच्या पार्वणांनीं
’अस्य माणवकस्य पितुर्मातृपितामहीप्रपितामह्यः’
वगैरे उच्चार करुन नान्दीश्राद्ध करावें. याप्रमाणेंच बाप जिवंत असलेल्या बटूनेंही, बाप अथवा भाऊ संनिध नसल्यास, बापाच्या पितरांच्या नांवानें स्वतः नान्दीश्राद्ध करावें; कारण मुंज झालेल्या बटूला कर्माचा अधिकार आहे. विवाहांतही हाच निर्णय समजावा. मेलेल्या बापाच्या मुलाचे-चौल, मुंज वगैरे संस्कार-चुलता, मामा वगैरे करणारे असल्यास, ज्याचा संस्कार करावयाचा त्याच्या पार्वणांनीं ’अस्य संस्कारस्य पितृपितामहप्रपितामहाः’ असा उच्चार करुन नान्दीश्राद्ध करावें. बाप जिवंत असून जवळ नसल्यानें मामा वगैरे संस्कार करणारा जो असेल त्यानें, ज्याचे संस्कार करायचे त्याच्या बापाच्या---आई, बाप वगैरेंच्या नांवानें नान्दीश्राद्ध करावें. बटूचीं आईबापें जर मेलेलीं असतील, तर त्यांच्या नांवानें (नान्दीश्राद्ध) करुं नये. याप्रमाणें नान्दीश्राद्धपार्वणाचा थोडक्यांत निर्णय येथें संपला.