चित्रा नक्षत्राचें पूर्वार्ध, पुष्यनक्षत्राचे मधले दोन चरण, पूर्वाषाढानक्षत्राचा तिसरा पाद आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पहिला पाद--यांवर जन्मणारा मुलगा---बाप, भाऊ यांचा नाश करुन स्वतः नाश पावतो. चित्रानक्षत्राच्या पूर्वार्धांत जन्म झाल्यास गोप्रसवशान्ति करुन नक्षत्र देवतेच्या प्रतिमेचें पूजन करावें आणि अजादान (शेळी) द्यावें. याप्रमाणेंच पुष्यनक्षत्राच्या दुसर्या व तिसर्या चरणीं जर जन्म होईल, तर गोप्रसवशान्ति, नक्षत्रदेवतेची पूजा आणि गाईचें दान हीं करावींत. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणावर जन्म झाल्यास नक्षत्रदेवतेची पूजा करुन तिलपात्रदान करावें. तसेंच पूर्वाषाढा नक्षत्राच्या तिसर्या चरणीं जन्म झाल्यास नक्षत्रदेवतेची पूजा करुन सुवर्णदान द्यावें. मघानक्षत्राच्या पहिल्या चरणीं जर जन्म होईल, तर त्याचें फळ मूळनक्षत्राप्रमाणेंच जाणावें. तशा वेळीं गोप्रसवशान्ति, नक्षत्रदेवतापूजन व ग्रहमख--हीं करावींत. मघानक्षत्राच्या पहिल्या दोन घटकांत जन्म झाल्यास नक्षत्रगण्डान्तशान्ति सुद्धां करावी. रेवतीच्या पहिल्या दोन घटकांत जन्म झाल्यास नक्षत्रगण्डान्तशान्ति सुद्धां करावी. रेवतीच्या पहिल्या दोन घटकांत किंवा अश्विनीच्या पहिल्या दोन घटकांत जन्म झाल्यास नक्षत्रगण्डान्तशान्ति, गोप्रसवशान्ति व ग्रहमख हीं करावींत. रेवती व अश्विनी यांच्या इतर भागीं आणि मघानक्षत्राच्या अखेरच्या तीन चरणांत जर जन्म झाला, तर विशेषसा दोष सांगितला नसल्यानें शान्त्यादिक कांहीं करण्याचें कारण नाहीं. विशाखाच्या चौथ्या चरणांत जन्म झालेला असल्यास बायकोचा भाऊ (शालक), दीर वगैरेचा नाश होतो, असें त्याचें दुष्ट फल सांगितलें असल्यानें, तत्प्रीत्यर्थ ग्रहमख करावा, असें कमलाकाराचें सांगणें आहे. इतर ठिकाणींही हाच निर्णय समजावा. अशा या नक्षत्रांच्या शान्ति होत.