कन्येचें नामकरण करतांना संकल्पांत ’अस्याः कुमार्या०’ हा विशेष होय. देवतेचें नांव ठेवावयाचें तें ’भक्ता’ असें आकारान्त असावें. मासनामांत सुचक्रिणी, वैकुण्ठी, वासुदेवी हीं तीन ईकारान्त समजावींत. हरि हें नांव मुलगा व मुलगी यांस सारखेंच आहे. बाकीचीं आठ नांवें आकारान्त आहेत. रोहिणी, कृत्तिका इत्यादि नाक्षत्र नांवें यथायोग्य ठेवावींत असें मातृदत्ताचें मत आहे. आश्वलायनशाखी यांनी कन्येचें नाक्षत्रनांव ठेवूं नये. यज्ञदाशमीसारखीं पुत्राप्रमाणें व्यावहारिक नांवें ठेवावींत. पूजादिक पुत्राप्रमाणेंच पण अवैदिक मंत्रांनीं करावींत. पुत्राच्या किंवा कन्येच्या नामकरणसमयीं पिता जर जवळ नसेल, तर आजादिकांनीं नमस्कार करावा. असा हा नामकरणसंस्कार आहे.