तांब्याचें भांडें किंवा पळसाचा द्रोण यांत तांबडया गाईचें मूत्र आठ मासे गायत्रीमंत्रानें घालावें. पांढर्या गाईचें शेण सोळा मासे ’गन्धद्वारां०’ या मंत्रानें त्यांत घालावें. पिवळ्या रंगाच्या गाईचें दूध बारा मासे ’आप्यायस्व०’ या मंत्रानें त्यांत मिसळावें. निळ्या गाईचें दहीं दहामासे ’दधिक्राव्ण०’ या मंत्रानें त्यांत टाकावें. काळ्या गाईचें तूप आठ मासे ’तेजोसि शुक्रमसि’ या मंत्रानें त्यांत ओतावें. आणि (शेवटीं) ’देवस्यत्वा०’ या मंत्रानें चार मासे त्या मिश्रणांत कुशोदक (दर्भ टाकलेलें पाणी) घालून, तें सर्व मिश्रण प्रणवमंत्रानें (ॐकाराच्या उच्चारानें) ढवळावें. येथें माशाचें प्रमाण पांच गुंजांचें समजावें. असें पंचगव्य तयार झाल्यावर, अग्रासहित सात दर्भ त्यांत बुडवून, त्यांचा जो होम करावा त्यावेळीं - ’इरावतीति पृथ्वीं इदं विष्णुरिति विष्णु मानस्तोके रुद्रं शन्नोदेवीत्यपः ब्रह्मजज्ञानमिति ब्रह्माणंवा अग्निं सोमंच नाम्ना गायत्र्या सूर्यं प्रजापते नत्वेति समस्तव्याहृतिभिर्वा प्रजापतिं अग्निं स्विष्टकृतंच नाम्ना इत्येताः पंचगव्येन अग्निं वायुं सूर्यं प्रजापतिं चेति वा महाविष्णुं वाज्येनाष्टाविंशतिसंख्याहुतिभिः’ असें अन्वाधान करावें. स्त्री व शूद्र यांनीं होम करुं नये, असें कांहीं ग्रंथकारांचें सांगणें आहे. स्त्रिया व शूद्र यांनीं पंचगव्य प्यावें अथवा पिऊं नये, असा विकल्प ’महार्णव’ ग्रंथात सांगितला आहे.