मागें सांगितल्याप्रमाणेंच भात, तांदूळ व तीळ यांच्या राशीवर कलशस्थापना करुन, मध्यें ’त्र्यम्बकं०’ या मंत्रानें रुद्राचें, त्याच्या दक्षिणेस ’उत्सूर्य०’ या मंत्रानें सूर्याचें व उत्तरेकडे ’आप्यायस्व०’ या मंत्रानें सोमाचें आवाहन करुन पूजा करावी. नंतर ’रुद्रसमिच्चर्वाज्यैः प्रतिद्रव्यमष्टोत्तरसहस्त्रशतान्यसंख्यातिलाहुतिभिःशेषेणेत्यादि’ असें अन्वाधान करावें, व बाकीचें कर्म पूर्ववत् करावें. संक्रान्तीच्या दिवशीं जर वैधृतियोग असेल, तर त्या दोहोंच्या देवता स्वतंत्र आहेत म्हणून दोन शान्त्या कराव्या. असा हा वैधृतिशान्तिनिर्णय आहे.