स्त्रिया व शूद्र यांनीं ब्राह्मणाकडून पंचगव्य तयार करवून मंत्रावांचून घ्यावें, असें ’स्मृत्यर्थसार’ ग्रंथांत सांगितलें आहे. कृच्छ्रापेक्षां जेव्हां कमी प्रायश्चित्तें असतील, तेव्हां हा प्रायश्चित्त विधि करुं नये, कृच्छ्रादिक सर्व प्रायश्चित्तें जेव्हा असतील, तेव्हां करावा. कृच्छ्रादिक प्रायश्चित्त करुन सूर्य व अरुण यांचा (सूर्यारुण) संवाद ऐकावा. आणि महार्णवादि कर्मविपाक ग्रंथांत सांगितलेल्या हरिवंशादि ग्रंथांचें श्रवण करावें. शुभ दिवशीं देशकालादिकांचा उच्चार करुन, --’अनेक जन्मार्जिता नपत्यत्व मृतापन्यत्वादि निदान भूतबालघात निक्षेपाहरण विप्ररत्नापहरणादि जन्यदुरित समूलनाशनद्वारा दीर्घायुष्म द्वहुपुत्रादि संतति प्राप्तिकामो हरिवंशं श्रोष्यामि’--असा संकल्प करावा. स्त्रीसह जर ऐकायचा असेल, तर द्विवचनी प्रयोग करावा. संकल्पानंतर---गणपतिपूजन. पुण्याहवाचन, नान्दीश्राद्ध, व विनायकशान्ति हीं केल्यावर---’हरिवंशश्रवनार्थं श्रावयितारं त्वां वृणे’ असा ऐकण्यासाठीं ब्राह्मण पसंत करावा. त्याची वस्त्रालंकारांनीं पूजा केल्यावर त्या ग्रंथ वाचणार्याला दररोज पायस इत्यादिकांनीं भोजन द्यावें. दंपतीनीं दररोज "त्रायताम्०" इत्यादि वैदिक मंत्रांनी व "सुरास्त्वाम्०" इत्यादि पौराणिक मंत्रांनीं स्नान करुन अलंकार धारण करावे व एकचित्त होऊन ग्रंथाचें श्रवण करावें. तेल, तांबूल, क्षौर, मैथुन व पलंगावर निद्रा करणें हीं ग्रंथश्रवणाची समाप्ति होईपर्यंत वर्ज्य करावीं आणि हविष्यान्न भक्षण करुन रहावें. अखेरीस ग्रंथ वाचणाराला गाय वं तीन तोळे अथवा एक तोळा अशी सुवर्णदक्षिणा देऊन. "प्रत्यंवरोह०" या मंत्रानें तिळ व घृत (तूप) यांचा प्रत्येकीं एक हजार होम करावा. शंभर ब्राह्मण किंवा चोवीस दंपत्यें यांना पायसाचें (खिरीचें) भोजन द्यावें. याप्रमाणें हरिवंशग्रंथाचे श्रवणाचा प्रयोग आहे.