आश्लेषा नक्षत्राच्या साठ घटकांचे जे दहा भाग करतात ते असे :- पहिला भाग पांच घटकांचा, दुसरा सात घटकांचा, तिसरा दोन घटकांचा, चौथा तीन घटकांचा, पांचवा चार घटकांचा, सहावा आठ घटकांचा, सातवा अकरा घटकांचा, आठवा सहा घटकांचा, नववा नऊ घटकांचा व दहाव पांच घटकांचा. यांपैकीं ज्या भागांत जन्म होईल त्यांचीं फळें पुढीलप्रमाणें अनुक्रमानें जीं समजावींत तीं अशीं : राज्य, पितृनाश, मातृनाश, कामभोग, पितृभक्ति, बळ, हिंसकत्व, त्याग, भोग आणि धन. आतां नक्षत्राचे चार चरण करुन त्यांचीं फळें सांगतों ती अशीं :- पहिला चरण शुभ, दुसरा धननाशक, तिसरा मातृनाशक आणि चौथा पितृनाशक. आश्लेषा नक्षत्राच्या शेवटच्या तीन चरणांत जन्मलेंली कन्या सासूचा नाश करते. याप्रमाणेंच शेवटच्या तीन चरणांत जन्मलेला पुत्रही आपल्या सासूला मारतो. आश्लेषा नक्षत्राच्या कोणच्याही चरणांत जरी जन्म झाला असला, तरी प्रयत्नानें शान्ति करावीच. शान्ति करायची ती जन्म झाल्यापासून बाराव्या दिवशीं करावी. बाराव्या दिवशीं न झाल्यास जन्मनक्षत्रीं किंवा इतर शुभ दिवशीं करावी. उक्तकाळीं गोप्रसवशान्ति करुन, ’अस्य शिशोः आश्र्लेषाजननसूचितसर्वारिष्टपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं’ असा संकल्प करावा. मूळनक्षत्रासंबंधींच्या शान्तीप्रमाणें दोन कलशांवर रुद्र आणि वरुण या दोन देवतांची पूजा करुन, चोवीस पाकळ्यांच्या कमळावर कलश ठेवून, त्यांतल्या प्रतिमेंत आश्लेषा नक्षत्राच्या सर्व देवतांचें आवाहन करावें. त्यांच्या पश्चिमेस पुष्यनक्षत्राची देवता बृहस्पति आणि उत्तरेस मघानक्षत्राची देवता पितर यांचें आवाहन करावें. चोवीस पाकळ्यांपैकीं पूर्वेकडच्या पाकळीपासून आरंभ करुन प्रदक्षिणाक्रमानें पूर्वानक्षत्राची देवता जी भग तिच्यापासून पुनर्वसु नक्षत्रदेवता जी आदिति तिच्यापर्यंत चोवीस देवतांचें आवाहानादिक करावें. तैत्तिरीय शाखेच्या मंत्रांनीं पुष्य, मघा, पूर्वा वगैरे नक्षत्रांचेंच फक्त आवाहन करावें व नक्षत्रदेवतांचें करुं नये, असें कौस्तुभांत सांगितलें आहे. त्यानंतर लोकापालांचें आवाहन करुन, सर्व आवाहित देवतांची पूजा करावी. नंतर अग्नि व ग्रह यांची प्रतिष्ठापना करुन अन्वाधान करावें. आदित्यादि ग्रहांच्या नांवानें अन्वाधान केल्यावर --’प्रधानदेवताः सर्पान् प्रतिद्रव्यमष्टोत्तर शतसंख्यामष्टाविंशतिसंख्यं वा घृतमिश्रपायससमिदाज्यचर्वाहुतिभिः बृहस्पतिं पितृंश्चाष्टाविंशतिसंख्यामष्टसंख्यं वा तैरेव द्रव्यैर्भगादिचतुर्विशति देवताः अष्टाष्टपायसाहुतिभिः रक्षोहणमित्यादि’ मुख्य देवतांचें अन्वाधान करावें. विशेष देवतांचा निर्देश मूळनक्षत्र शान्तीप्रमाणेंच करावा. त्याप्रमाणेंच--पायस, कृसर व चरु--हीं शिजवावींत व त्या हवीचा त्याग करावा. कौत्सुभांत सांगितलेल्या प्रधानदेवतांच्या मंत्रांनीं त्या त्या देवतांचा होम करावा. बाकीचें सारें कर्म मूळनक्षत्राच्या कर्माप्रमाणेंच करावें.