अमुक मूळनक्षत्र (म्हणजे काय त्याचें स्पष्टीकरण मागें सांगितलेंच आहे) असतां जर जन्म झाला, तर त्या बालकाचा आठ वर्षें त्याग करुन मग शान्ति करावी. अभुक्त मूळनक्षत्र नसून अन्य मूळनक्षत्र असतां (जन्म झाल्यास) बारांव्या दिवशीं किंवा जवळ येणार्या मूळ नक्षत्रानें युक्त अशा शुभदिनीं अथवा दुसर्या शुभ दिवशीं गोप्रसवशान्ति करुन ’अस्य शिशोर्मूलप्रथमचरणोत्पत्तिसूचितारिष्टनिरासार्थं सग्रहमखां शान्तिं करिष्ये’ असा संकल्प करावा. दुसर्या तिसर्या वगैरे पादांवर जन्म झाल्यास संकल्पांत तसा उच्चार करावा. ब्रह्मा व सदस्य हे विकल्पानें घ्यावेत. ऋत्विज आठ किंवा चार घ्यावेत. मधल्या कलशावर सोन्याच्या प्रतिमेंत रुद्रदेवतेचें आवाहन करावें. त्याच्या चार दिशांना चार कलश मांडून त्यांवर तांदुळाच्या राशि कराव्या व वरुणदेवतेची त्यांवर पूजा करावी; किंवा मधल्या कलशावर रुद्राची स्थापना करुन, त्याच्या उत्तरेकडच्या कलशावर वरुणाची पूजा करावी. याप्रमाणें दोन कलश घ्यावेत. रुद्रदेवतेच्या उत्तरेकदच्या कलशावरच्या प्रतिमेंत-निऋति, इन्द्र व आप या देवतांचें आवाहन करुन, उत्तराषाढापासून अनुराधापर्यंतचीं जीं चोवीस नक्षत्रें व त्यांच्या विश्वेदेवादि ज्या चोवीस देवता, त्यांचें तांदुळांच्या राशींवर कमळाच्या चोवीस पाकळ्या ठेवून त्यांवर आवाहन करावें. तद्वतच आठ दिशांत आठ लोकपालांचे आवाहन करावें. नंतर सर्वांची पूजा करावी. अग्निस्थापना आणि ग्रहस्थापना झाल्यावर जें अन्वाधान करावें तें असें :- ’अर्कादिग्रहान्’ .....इ० अन्वाधान करावें. यांत जेथें ’कवीन्’ असें म्हटलें आहे, तेथें ’ऋत्विकस्तुतिं’ असें म्हणण्याबद्दल मयूखादि ग्रंथांत सांगितलें आहे. तीन सुपांत (निर्वाप) तांदूळ घ्यावेत. पहिल्या सुपांत पायसासाठीं मंत्ररहित अशा बारा मुठी तांदूळ-निऋति, इन्द्र आणि अप् --यांच्या करतां घ्यावेत. दुसर्या सुपांत भातासाठीं त्याच तीन देवतांच्या नांवानें बारामुठी तांदूळ घ्यावेत. पुन्हां पहिल्या सुपांत शहाण्णव मुठी पायसाकरितां घालावेत. तिसर्ता सुपांत कृसराकरितां चवेचाळीस मुठी घ्यावेत. दुसर्या सुपांत पुन्हां चार मुठी घ्यावे. पहिल्या सुपांत पुन्हां सोमदेवतेसाठीं चार मुठी घ्यावे. त्यानंतर तीन सुपांत सर्व आहुतींना पुरतील इतके तांदूळ घेऊन, पूर्वी जितक्या जितक्या म्हणून मुठींनीं तांदूळ घेतले तितक्या तितक्या संख्येनें ते धुवून त्याचे तीन वेगळाल्या भांडयांत तीन हवि शिजवावे. तिलमिश्रित तांदूळ शिजविल्यानें कृसर होतो. ग्रहांच्या होमाकरतां घरांत शिजविलेला भात घ्यावा. निऋत्यादि देवतांसाठीं ज्या क्रमानें तांदूळ घेतले त्याच क्रमानें ते शिजवावेत, असें सर्व ग्रंथांत सांगितलें आहे; यास्तव, घरांत शिजविलेल्या भातांतच तीळ, दूध वगैरे टाकून तयार झालेला तो कृसर किंवा पायस नव्हे. प्रमाद (चूक), आळस वगैरेंनीं केलेला तो कर्मभ्रंशच होय. त्यानंतर यजमानानें होमकालीं जो द्रव्यत्याग करावा तो असा :- ’एतावत्संख्याहुतिपर्याप्तं प्रजापतये च न मम ॥’ इ० विस्तरानें त्या द्रव्यांच्या संख्यांचा व देवतांचा उच्चार करुन सर्वत्र त्याग करावा. कोणी ग्रंथकार--’इदमुपकल्पितमन्वाधानोक्तद्रव्यजातं अन्वाधानोक्ताहुतिसंख्या पर्याप्तमन्वाधानोक्ताभ्यो यक्षमाणाभ्यो देवताभ्यो न मम ।’ अशा संक्षेपानें त्याग करतात. त्यागानंतर ग्रहांच्या मंत्रांनीं व निऋत्यादिक देवतामंत्रांनीं यथासांग होम केल्यावर ग्रहपूजा, नलाहुति, बलिदान, पूर्णाहुति पूर्णपात्रविभोक, अग्निपूजा वगैरे कार्य करावें. व नंतर यजमानादिकांना अभिषेक करावा. त्यानंतर यजमानाने शुभवस्त्र व गंध हीं धारण करुन ’मानस्तोके०’ या मंत्रानें विभूतिधारण करावें. व मग मुख्य देवतांचें पूजन, विसर्जन, श्रेयोग्रहण आणि दक्षिणादान हीं कृत्यें केल्यावर--शंभर, पन्नास किंवा दहा ब्राह्मणांना भोजन द्यावें. अशी ही याची थोडक्यांत माहिती समजावी.