गर्भारशीनें हत्ती, घोडा इत्यादिकांवर बसूं नये. पर्वत, हवेली वगैरेवर चढूं नये. व्यायाम, भरभर चालणें व गाडीत बसणें वर्ज्य करावींत. राखाडींत, मुसळावर किंवा उखळावर बसूं नये. पाण्यांत बुडी मारुन स्नान करुं नये. माणूस नसलेल्या घरांत जाऊं नये. झाडाच्या मुळाशीं बसूं नये. भांडण करणें, अंग मोडणें, तिखट खाणे व अति उष्ण पदार्थ सेवन करणे-हीं सोडावींत. संध्याकाळीं अतिथंड व आंबट जडान्न खाऊं नये. मैथुन, शोक, रक्त काढणें, दिवसां झोंप घेणें, रात्रीं जागरण करणें, राखाडी-कोळसे-नखें यांनीं जमिनीवर रेघा ओढणें, नेहमीं झोप घेणें, वाईट शब्द बोलणें, फार हंसणें, केंस मोकळे सोडणें, उद्विग्न राहणें व कोंबडयासारखें बसणें--हें सोडून द्यावें. नेहमीं शुद्ध राहणें, चांगले मंत्र लिहिणें, सुगन्ध घेणें, फुलांच्या माळा घालणें, गन्धादिकांची उटी लावणें, निर्मळ घरांत राहणें, स्वच्छ वस्त्र नेसणें, दान करणें, सासूसासर्यांची सेवा करणें वगैरे गोष्टींनीं गर्भाचें नित्य संरक्षण करावें. हळदकुंकू, शेंदूर, काजळ, न्हाणें, विडाखाणें, व सौभाग्यालंकार धारण करणें--या गोष्टी शुभ आहेत. चौथा, सहावा आणि आठवा --या महिन्यांत गर्भिणीनें कधींहि कोठें प्रयाण करुं नये. सहाव्या महिन्यानंतर केव्हांही प्रयाण करणें वर्ज्य करावें.