येथें प्रथम मूळ नक्षत्राचें फळ सांगतों. मूळनक्षत्राचा पहिल्या चरणीं पुत्र झाला तर बाप मरतो; दुसर्या चरणी झाल्यास आई मरते; तिसर्या चरणीं धननाश होतो; आणि चौथ्या चरणी कुलनाश होतो; म्हणून शान्ति अवश्य करावी. चौथा चरण शुभ असल्याचें क्वचित् ग्रंथांत सांगितलें आहे. मूळ नक्षत्रावर मुलगी झाल्यास त्याचेंहि फळ असेंच असतें, असें ज्ञाते म्हणतात. मूळ नक्षत्रीं झालेली मुलगी आईबापांना मारक न होतां सासर्याला मारते. आश्र्लेषा नक्षत्रावर झालेली कन्या सासूला मारते. ज्येष्ठावरची ज्येष्ठ दिराला मारते. विशाखांतील धाकटया दिराला मारते. पुष्कळ शान्ती केल्यानें दोष जातो, असें कांहीं ग्रंथकार सांगतात. अभुक्त मूळ नक्षत्रावर जन्मलेलें मूल आठ वर्षेंपर्यंत टाकावें, किंवा आठ वर्षें पित्यानें त्याचें तोंड पाहूं नये. ज्येष्ठा नक्षत्राची अखेरची एक घटका व मूळ नक्षत्राच्या सुरुवातीच्या दोन घटका यांचें नांव अभुक्त मूळ किंवा ज्येष्ठानक्षत्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या सुरवातीच्या पहिल्या दोन घटका अशा ज्या चार घटका तें अभुक्त मूळ जाणावें. वृषभ, वृश्चिक, सिंह व कुंभ या लग्नीं मूळनक्षत्र स्वर्गलोकीं असतें. मिथुन, तूळ, कनय व मीन या लग्नीं तें पाताळांत असतें. मेष, धनु कर्क व मकर या लग्नीं मनुष्यलोकांत असतें. या लग्नांचें फळ येणेंप्रमाणें:-स्वर्गस्थ लग्न असतां जर मूळ नक्षत्र असेल जर राज्यप्राप्ति, पातालस्थ असतां धनप्राप्ति आणि मनुष्यलोकीं असतां शून्य फळ. आश्लेषा नक्षत्राचा दोष नऊ महिने असतो, मूळनक्षत्राचा आठ वर्षे असतो व ज्येष्ठा नक्षत्राचा पंधरा महिने असतो; यास्तव तितका कालपर्यंत मुलाचें दर्शन वर्ज्य करावें. व्यतिपातांत जन्म झाल्यास अंगहानि, परिघावर स्वतःचा मृत्यु व वैधृतीवर पितृहानि होतात. अमावास्येला जन्म झाल्यास अंधळेपणा, मूळावर समूळ नाश, धृतियोगावर कुलनाश, दोन संधिकालांत विकृताङ्ग व हीनांग असें होतें. याचप्रमाणें दांत असलेल्या अवस्थेंत मूल जन्मणें व पायाळू जन्माला येणें या गोष्टी अरिष्टकारक असल्यानें क्रूर ग्रहांची शान्ति करावी. व्यतिपात वगैरेवर जन्मलेल्यांकरितां त्या त्या अरिष्टांप्रीत्यर्थ ग्रहमखांसहित अवश्य शान्ति करावी. इतर शान्तींत ग्रहमख आवश्यक नाहीं. शान्तीच्या होमाचा काल येणेंप्रमाणें :- जन्माच्या बाराव्या दिवशीं जन्मनक्षत्रीं, किंवा शुभ दिवशीं शान्ति करावी. जन्माच्या बाराव्या दिवशीं जर शान्ति करावयाची असेल, तर त्यासाठीं सांगितलेलीं नक्षत्रें, अग्निचक्र वगैरे पाहण्याची जरुरी नाहीं. इतर वेळीं शान्ति करणें असल्यास अवश्य पाहावींत. इतर शान्तीविषयींही हेंच जाणावें.