सूर्यनक्षत्रापासून आरंभ करुन चंद्रनक्षत्रापर्यंतचीं नक्षत्रें मोजावींत. तीन तीन नक्षत्रें मिळून एकेका ग्रहाच्या तोंडांत आहुति पडते. पहिल्या तीन नक्षत्रीं सूर्यमुखांत, दुसर्या तीन नक्षत्रीं बुधाच्या मुखांत, तिसर्या तीन नक्षत्रीं शुक्रमुखांत, चौथ्या तीन नक्षत्रीं शनिमुखांत, पांचव्या तीन नक्षत्रीं चंद्रमुखांत, सहाव्या तीन नक्षत्रीं मंगळमुखांत, सातव्या तीन नक्षत्रीं गुरुमुखांत, आठव्या तीन नक्षत्रीं राहुमुखांत व नवव्या तीन नक्षत्रीं केतूच्या मुखांत. ज्या दिवशीं पापग्रहाच्या तोंडांत आहुति पडतो तो दिवस अशुभ व ज्या दिवशीं शुभग्रहाच्या मुखीं आहुति पडतो तो दिवस शुभ. शान्तिकर्मांत अग्नि मांडण्याच्या वेळीं अथवा पूर्णाहुतीच्या समयीं आहुती व अग्नि हीं पाहावींत. तीन उत्तरा, रोहिणी, श्रवण. धनिष्ठा, शततारका, पुनर्वसु, स्वाती, मघा, अश्विनी, हस्त, पुष्य, अनुराधा व रेवती--हीं नक्षत्रें असतांना आणि गुरुशुक्रांचें अस्त व मलमास यांनीं रहित असा शुभवार व तिथि--हीं पाहून शान्ति करावीं. निमित्तानें प्राप्त होणारें जें नैमित्तिक कर्म व रोगाची शान्ति यांच्या बाबतींत अस्तादिकांचा विचार करुं नये. याप्रमाणें या शान्तीच्या निर्णयप्रसंगानें इतर सर्व शान्तींना उपयोगी पडेल असा हा शुभदिननिर्णय होय.