जन्मल्यापासून किंवा गर्भ राहिलेल्या दिवसापासून पहिल्या, दुसर्या, तिसर्या किंवा पांचव्या वर्षी चौलकर्म करणें प्रशस्त होय. उपनयनाबरोबरहि ( मुंजीच्या वेळीं) हें कर्म केलें तरी चालतें. या बाबतींत कुलाचाराप्रमाणें वागावें. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने या कर्माला शुभ होत. जन्ममास व अधिक मास यांत हें कर्म करुं नये. ज्येष्ठाचें ज्येष्ठ महिन्यांत चौल करुं नये. या कर्माला शुक्ल पक्ष योग्य होय. कृष्णपक्षांतल्याहि अखेरच्या पांच तिथि वर्जून हें कर्म बाकींच्या तिथीवर करण्यास हरकत नाहीं. द्वितीया, तृतीया, पञ्चमी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी या तिथि या कर्माला शुभ होत. रविवारी ब्राह्मणाचें, मंगळवारीं क्षत्रियाचें, शनिवारीं वैश्याचें व शूद्राचें चौल करावें. गुरु, शुक्र व बुध हे वार आणि शुक्लपक्षांतला सोमवार हे सर्वांनाच या कार्यासाठीं शुभ समजावे. अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, ज्येष्ठा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती हीं नक्षत्रें चौलाला शुभ होत. क्षौर, प्रयाण व औषध या बाबतींत जन्मनक्षत्र नेहमींच वर्ज्य करावें, असें वचन आहे. अनुराधा, कृत्तिका, तीन उत्तरा, रोहिणी व मघा या नक्षत्रांवर चौल केल्यास आयुष्याचा क्षय होतो. सिंहस्थ गुरु असतां, चौलाचें शुभ कर्म करुं नये. मुलगा पांच वर्षांहून कमी वयाचा असतां, त्याची आई जर गर्भार असली, तर हें चौलकर्म (चूडाकर्म=शेंडी ठेवणें) करुं नये. पांच वर्षांचा मुलगा असल्यास गर्भिणीदोष नाहीं. गर्भिणीसंबंधानेंही तिच्या गर्भाच्या पांचव्या महिन्यापर्यंत दोष नाहीं. कारण पांचव्या महिन्याच्या पूर्वीं (चूडाकर्म) करावें, पांचव्या महिन्यानंतर करुं नये. असें वचन आहे. बालक ज्वरादिकांनीं आजारी असतां चौलाचें मंगलकार्य करुं नये. विवाह, व्रत व चूडाकर्म, हीं मंगल कर्में माता विटाळशी असतां करुं नयेत. तिची शुद्ध झाल्यानन्तर करावींत. असें मनूनें सांगितलें आहे. नान्दीश्राद्धानंतर जर रजस्वला (विटाळशी) होईल तर शान्ति करुन (हीं कर्में) करावींत. दुसरा मुहूर्त नसेल व माता या कार्यांना आरंभ करुण्याच्या आधीं जर विटाळशी असेल, तर श्रीफलाची (नारळाची) पूजा वगैरे करण्याच्या विधीनें शान्ति करुन (हीं कर्में) करावींत, असें कांहीं ग्रंथकार सांगतात. (बापाच्या अभावीं) मामा, चुलता वगैरे जे हीं कर्मे करण्यास योग्य आहेत, त्यांच्या पत्न्या जर विटाळशा असतील तर हीं कर्मे करुं नयेत, असें निर्णयसिन्धूंत सांगितलें आहे. तीन पुरुषरुप कुलांत विवाहरुप मंगलकार्य झाल्यानंतर सहा महिन्यांत मुण्डन, चूडाकर्म वगैरे कर्में करुं नयेत. संकटप्रसंगीं निराळें वर्ष सुरु झाल्यावर करावींत. याचा अर्थ असा कीं, फाल्गुनांत जर मङ्गल कार्य झालें असले तर नव्या वर्षांत चैत्रादि महिन्यांत करावें. चार पुरुषांपर्यंत कुलांत सपिण्डीकरण, मासिकश्राद्धें वगैरेंनीं शेवट होणारें जें प्रेतकर्म, त्याच्यासमाप्तीच्या आधीं चूडाकर्मादि मङ्गलकार्यें करुं नयेत. एकाच मातेपासून झालेले दोन बन्धु अगर बहिणी अथवा भाऊबहीण यांचा समान संस्कार त्याच (एकाच) वर्षीं करुं नये. माता भिन्न असल्यास करावा. मङ्गलकार्यांना प्रारम्भ केल्यानंतर जर सुतक येईल, तर कूष्माण्डी ऋचांनीं तुपाचा होम करुन गाय दान द्यावी व नन्तर चौल, मुंज, लग्न वगैरे कार्यें करावींत. या संबंधाची विशेष माहिती विवाहप्रकरणांत सांगेन. मध्यभागीं एक मुख्य शिखा (डोक्यांवरील केंसांची बट) व बाकीच्या तिच्या सर्व भोंवतालच्या वाटोळ्या भागीं जसा कुलाचार असेल त्याप्रमाणें प्रवरांच्या संख्येला अनुसरुन चूडाकर्मसमयीं (बटा) ठेवाव्या. मुंजीच्या वेळीं शेंडीच्या मधल्या बटेवांचून भोंवतालच्या इतर सर्व बटा काढून टाकून मधली तेवढीच ठेवावी. चौलकर्म व जातकर्म यांत जेवलें असतां, सान्तपनकृच्छ्रप्रायश्चित्त सांगितलें आहे. इतर संस्कारांत (भोजन केल्यास) उपास करण्यानें शुद्धि होते. जन्मापासून चूडाकर्माचे स्त्रियांचे संस्कार बिनमंत्रांनीं (अमन्त्रक) करावेत व होम तेवढा समन्त्रक करावा. होमही अमन्त्रक करावा अथवा मुळींच करुं नये, असें वृत्तिकर्त्यादिकांचें मत आहे. शूद्राचें चौलकर्म याप्रमाणेंच अमन्त्रक करावें. सध्यां शिष्ट लोक स्त्रियांचे चूडाकर्मादि संस्कार करीत नाहींत व विवाहाच्या वेळीं चूडादिकर्मांच्या लोपांचें प्रायश्चित्त मात्र करतात. चूडाकर्मानंतर तीन महिनेपर्यंत पिण्डदान व तिलतर्पण हीं करुं नयेत. महालय, गयाश्राद्ध व मातापित्यांचीं वार्षिक श्राद्धें यांत तेवढें पिण्डदान करावें.