याप्रमाणें पुण्याहवाचन आणि ऋतुदक्ष नांवाच्या विश्वेदेवांसहित असें जें नान्दीश्राद्ध तें करुन आपापल्या शाखेप्रमाणें गर्भाधानसंस्कार करावा. जे आश्वलायनशाखी असतील त्यांनीं गृह्याग्नींत प्रजापतिदेवतात्मक भाताचा होम करुन, विष्णूला सहा व प्रजापतीला एक अशा आहुतींनीं हवन करावें; व जप, अग्नीचें उपस्थान, दूर्वांचा रस नाकांत पिळणें वगैरे करावें. व्रती होऊन तीन बोटांनीं योनीला स्पर्श करावा आणि ’विष्णुर्योनिं०’ या सूंक्ताचा जप करावा, व मग गर्भाधान करावें, म्हणजे खात्रीनें सुपुत्र जन्माला येतो. तद्वतच ’नेजमेष०’ इत्यादि मंत्रांचाहि जप करावा. होम करण्याचा मुळींच संभव नसल्यास अश्वगन्धेचा रस ’उदीर्ष्वान्त०’ या मंत्रानें उजव्या नाकपुडींत घालून स्त्रीसमागम करावा. अशा तर्हेनें गर्भाधानसंस्कार केल्यावांचून जर गर्भोत्पत्ति होईल, तर त्याला गोप्रदानाचें प्रायश्चित्त देऊन, पुंसवन करावें. ’तैलाभ्यंग, हजामत, मैथुन व लघवी यांच्या शुद्धीनंतर जो कोणी आचमन करीत नाहीं, तो अहोरात्रानें शुद्ध होतो,’ असें वचन असल्यानें , आचमन केलें नसल्यास, एक दिवस उपास करावा. मैथुन संपल्यावर बायकांनीं स्नान करुं नये; कारण, ’अंथरुणावरुन उठलेली स्त्री शुद्धा असते व पुरुष अशुद्ध असतो’ असें वचन आहे. याप्रमाणें गर्भाधानाला उपयोगी असा जो निर्णय (येथवर संक्षेपांत) सांगितला, तो येथें संपला.