ज्येष्ठा नक्षत्राच्या साठ घटकांचे समान दहा भाग करावे व ज्या भागांत जन्म होईल त्यांचीं जीं फळें जाणावीत तीं अशीं :- पहिल्या भागांत जन्म झाल्यास मातेची आई मरते, दुसर्यांत झाल्यास मातेचा पिता मरतो, तिसर्यांत झाल्यास मामा मरतो, चौथ्यात माता मरते, पांचव्यांत स्वतःलाच मरण येतें, सहाव्यांत गोत्रज मरतात, सातव्यांत पिता व माता यांचा कुलनाश होतो, आठव्यांत थोरला भाऊ मरतो, नवव्यांत सासरा मरतो, व दहाव्यांत जन्म झाल्यास खात्रीनेंच सर्वांस मारतो. ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेला मुलगा आपल्या वडील भावाला मारतो. कन्या वडील दिराचा ताबडतोब प्राणनाश करते. या नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांत जन्मणारा श्रेष्ठही होतो. शेवटच्या चरणांत जन्मणारा स्वतःचा व बापाचा प्राणनाश करतो.
बाराव्या दिवशीं अथवा शान्तीला योग्य अशा शुभदिवशीं गोप्रसवशान्ति करुन,
’अस्य शिशोज्येंष्ठार्कजननसूचितसर्वारिष्टपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं’
असा संकल्प केल्यावर, मधल्या कलशावरच्या सोन्याच्या प्रतिमेंत---ऐरावतावर इन्द्राणीसह असलेल्या इन्द्राचें व लोकपालांचें आवाहन करावें, आणि त्यांना तांबदीं वस्त्रें अर्पण करुन त्यांची षोडशोपचारें पूजा केल्यावर त्यांना करंजांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यांच्या चार बाजूंना चार कलश व पूर्वेस मध्यभागीं शंभर भोंकांचा एक कलश अशा पांच कलशांची स्थापना करावी. नंतर त्यांवर पूर्णपात्रें ठेवून फलादिकांवर वरुणाचें आवाहन व पूजन करावें. ग्रहांचें अन्वाधान झाल्यानंतर
’इन्द्रं पलाशसमिदाज्यचरुद्रव्यैः प्रतिद्रव्यमष्टोत्तरशतसंख्ययाइन्द्रायेन्दो मरुत्वते इति मंत्रेण प्रजापतिमष्टोत्तरशततिलाहुतिभिः समस्त व्याहृतिमंत्रेण शेषेण स्विष्टकृतमित्यादि’
असं अन्वाधान करावें, आणि १०८ ब्राह्मणांना भोजन द्यावें. असा हा ज्येष्ठाशान्ति संक्षेप समजावा.