भावंडें अथवा पितापुत्र इत्यादिकांचा जन्म जर एकाच नक्षत्रावर झाला, तर त्यांपैकीं एक खात्रीनें मरतो. बापाच्या अथवा आईच्या जन्मनक्षत्रावर मुलगा अथवा मुलगी झाल्यास गोमुखप्रसव शान्ति करावी. सख्खा भाऊअ अथवा बहीण यांच्या जन्मनक्षत्रावर भाऊ अथवा बहीण झाल्यास गोप्रसवशान्ति न करतां, नुसतीच शान्ति करावी.
’पित्रेकनक्षत्रोत्पत्तिसूचितसर्वारिष्ट’ किंवा ’मात्रेकनक्षत्र०’
यांपैकीं योग्य असेल तो संकल्प करावा. ज्या नक्षत्रीं जन्म असेल त्याची किंवा त्या नक्षत्रदेवतेची प्रतिमा तांबडया वस्त्रांत कलशावर मांडून,
’अग्निर्नःपातुकृत्तिका’
इत्यादि तैत्तिरीय मंत्रांनीं तिची पूजा करावी.
’इदं नक्षत्रं अमुकां नक्षत्रदेवतां वा समिच्चर्वाज्यैः प्रतिद्रव्यमष्टोत्तरशत संख्यं शेषेणेत्यादि’
असें अन्वाधान करुन शेवटीं, ज्यांचे जन्म एकनक्षत्रावर झाले असतील त्यांना अभिषेक करावा. या प्रसंगीं ग्रहमख आवश्यक नाहीं. हरिहरांच्या प्रतिमेची पूजा करुन तिचें दान करावें, असेंही क्वचित् ग्रंथांत सांगितलें आहे.