ज्या बालकाला वरचे दांत आधीं येतात किंवा जें बालक दांतांसह जन्माला येतें, अथवा दुसरा, तिसरा, चौथा आणि पांचवा या महिनयंत ज्या बालकांना दांत येतात, तेव्हां मोठें भय प्राप्त होतें. माता, पिता यांना अथवा स्वतःलाच तो मारतो. सहाव्या अथवा आठव्या महिन्यांत दांत आल्यास त्याची आई अथवा बाप मरण पावतात, किंवा बालकालाच निःसंशय पीडा होते. आठव्या महिन्यांत दांत आल्यास तें शुभ लक्षण होय, असें कांहीं ग्रंथकारांचें मत आहे. पहिल्यानें जर वरचे दांत येतील तर
’अस्य शिशोः प्रथममूर्धदन्तजननसूचितसर्वारिष्ट०’
किंवा दांतांसह जन्म झाला असल्यास
’अस्य शिशोःसदन्तजननसूचित०’
अशा प्रकारें योग्य तो संकल्प करावा. स्थंडिलाच्या उत्तरेस नौका अथवा स्वस्तिकयुक्त सुवर्णपीठ यांपैकीं एका कशावर तरी बालकाला ठेवून, सर्वौषधियुक्त अशा पाण्यानें त्याला स्नान घालावें व नंतर स्थण्डिलाच्या पूर्वभागीं ठेवलेल्या कलशावरील प्रतिमांत-धाता, वह्नि, चन्द्र, वायु, पर्वत आणि केशव या सहा देवतांची पूजा करावी. ग्रहांचें अन्वाधान केल्यावर
’धातारं सकृच्चरुणा वन्ह्यादिपञ्चदेवता एकैकयाज्याहुत्याशेषेणेत्यादि’
असें अन्वाधान करावें.
’धात्रे त्वा जुष्टं निर्वपामि’
असें म्हणून निर्वाप व प्रोक्षण हीं करावींत. चरुचा होम नाममंत्रानें करावा. स्त्रुवापात्रानें (यज्ञांतील लांकडी पळी) वन्हि वगैरे देवतांना नाममंत्रानेंच पांच आहुति द्याव्या. होमानन्तर दक्षिणा द्यावी. सात दिवसपर्यंत रोज ब्राह्मणांना यथाशक्ति भोजन द्यावें. आठव्या दिवशीं सुवर्णाचें वगैरे दान करुन सर्व कर्म ईश्वराला अर्पण करावें. सहावा आठवा या महिन्यांत जर दांत येतील तर, फक्त एका बृहस्पतिदेवतेचीच पूजा करावी, व दहीं मध आणि तूप यांत भिजविलेल्या पिंपळाच्या समिधांनीं बृहस्पतिमंत्रानें १०८ होम करावा. घृतानें स्विष्टकृत् होम करावा. अशी ही दन्तजननशान्ति आहे.