|
सना . ( आपण षष्ठी ). स्वत : चा ; मालकीचा ; आपण या शब्दाप्रमाणें याचाहि प्रयोग तिन्ही पुरुषी , दोन्हीं वचनांत करतात . आपण पहा . भ्रांतिष्ट किंवा अनिश्चयी मनुष्याच्या बोलण्यांत हा शब्द निरर्थक , वाक्यपूरणार्थक येतो . उ० मी आपला येथून उठलों ; तो आपला त्याच्या घरीं गेला . काय मेलीं अलीकडचीं कार्टी तरी ! ... ... लहान नाहीं , मोठं नाहीं , आपलं उठ घोड्या पाणी पी ! - सुंदरची संक्रांत . आपला हा शब्द पुष्कळ वेळा सुशिक्षित लोकांकडूनहि आपण या अर्थी वापरण्यांत येतो ; जसें - आपल्यास किंवा आपल्याला = आपणांस . [ आपण षष्ठी ; सं . आत्मीय ; प्रा . अपुल्ल ; गु . आपणु ] आपली वाढवून खाणें - आपमतलबीपणानें आपलेंच घोडें पुढें ढकलणें ; आपल्या हिताकडेच पाहणें . - आपलीशी करणें - आपलें म्हणणें ( पक्ष , मत ) सिध्द करणें , प्रस्थापित करणें ; आपली सरशी करणें . वश करणें ; ताब्यांत आणणें . प्रपंच वैरी मारावा । अथवा आपलासा करावा । विपू . ७ . १४४ . स्वत : च्या मनाप्रमाणें वागणें . आपला , आपलासा म्हणणें , समजणें - एखाद्यास आत्मीय भावनेनें किंवा मित्रत्वाच्या भावनेनें वागविणें ; मित्र समजणें . ज्यास मीं एकदां आपलासा म्हटलें त्याच्यासाठीं मीं हवी तितकी घस सोशीन . तूं आपला ऐस - तूं आपलें स्वत : चें काम पहा , दुसर्याची उठाठेव करुं नको म्ह० आपल्या ( ला ) चेप्या , दुसर्या ( ला ) फुल्या = आपल्यास घ्यावयाचें असलें म्हणजे माप दाबून भरणें व दुसर्यास द्यावयाचें असलें म्हणजे माप पोकळ भरणें . ही म्हण लोभी किंवा आपमतलबी माणसास लावतात . आपलें तें मापलें व दुसर्याचें तें दुपायलें . आपला कान पिळून घेणें = एखादी गोष्ट करुन ती बिघडली म्हणजे पुन्हां तशी न करण्याचा निश्चय करणें ; अद्दल घडणें आपला हात आणि जगन्नाथ = एखादें कार्य स्वत : च्या हातांत असलें म्हणजे त्यांत स्वत : चा स्वार्थ साधणें . ( जगन्नाथपुरी येथील प्रसाद एका ठिकाणीं ठेवलेला असतो व त्यांतून यात्रेकरुनें हवा तितका ( पुष्कळ सुध्दां ) घ्यावयाचा असतो ; किंवा जगन्नाथ म्हणजे सर्व सत्ताधीश - हात . ) विपुलता व हवें तेवढें घेण्याची मुभा याअर्थी ही म्हण रुढ झाली असावी . ०तुपला वि. माझा तुझा ; स्वत : चा व परक्याचा ; आपपर . आपली मालकीची ; आपली म्हटलेली ( मिळकत , जिन्नस वगैरे ). आपपर किंवा आपअपर याच्यासारखेच आपला तुपला यापासून सामसिक शब्द बनतात . ०माणूस मनुष्य - पुन . प्रीतीचा मनुष्य . आपल्या मनुष्याला कोणी कमी कां करतो ? - करंज्याचा फार्स २२ . आपलाला - वि . आपआपला ; ज्याचा त्याचा स्वत : चा ; आपलाले कपडे सांभाळा ! आपलूक आपलुकी - स्त्री . ( चि . ) आपलेपणा ; स्वकीयता . आपले आपण आपल्याआपण - क्रिवि . आपखुषीनें ; स्वयंप्रेरणेनें ; आपण होऊन . आपलें उगीच - विनाकारण ; निरर्थक . आपला अर्थ २ पहा . आपलें उगीच कारागिराची कुशलता पाहून माझी दृष्टि तिकडे वळली . - मृ ५८ . - आपल्या अंगीं अंगें अंगानें - स्वत :; खुद्द . आपल्या आपण - दुसर्याच्या मदतीवांचून ; स्वत : च ; आपसूक . आपल्या घरचा थोर राजा - वि . हट्टी , हेकेखोर मनुष्य . स्वत : च्या घरीं जबरदस्तीनें वागणारा व बाहेर लोकांत थंड - नरमपणानें वागणारा ; गांवचा गांड्या आणि बायकोचा देशपांड्या . दुसर्यावर विनाकारण वर्चस्व गाजविणारा . तो असेल आपल्या घरचा थोर , मला काय ? आपल्यांत - स्वगत ( भाषण ) जुन्या नाटकांतून स्वगत या अर्थी आपल्यांत हा शब्द योजीत असत . भीमराव :-( थांबून आपल्यांत ) - रत्नकांता नाटक २४ .
|