स्वर अंतरंगाचे - तसे नको
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
श्रीमंत जसे बडेजाव करती
पैशाच्या जोरावर दीना तुच्छती
खाऊनी पिऊनी ती ऐश लुटती
मला नको जादा दे पोटापुरती ॥१॥
लाटा जशा उसळती सागरात
भिडू पहाती व नभांतरात
अंती तिरी आपटती नाराजीत
तसे न घडावे मम हृदयात ॥२॥
वादळ जसे सुटते पृथ्वीवरी
सुसाट धावे बनुनी अविचारी
जाता जाता तरु घरे नष्ट करी
तसे न माझे मन व्हावे अघोरी ॥३॥
महापूर जसा गर्वाने वहातो
जिवीत, वित्तावर नाचत जातो
तो मार्गातील सर्व नष्ट करतो
असे नकोच देशात मी वंदीतो ॥४॥
सत्ताधारी जसे सत्ता गाजवती
जात पात धर्म न्यायात ओढीती
पदवीचा गैरवापर ही निती
असली सत्ता नको माझे नियती ॥५॥
रोगराई दु:खे जशी येती जाती
भोगल्या शिवाय याची ना समाप्ती
घायाळ करुनी मिष्कील हासती
श्रीस्वामी समर्था नको ही आपत्ती ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP