स्वर अंतरंगाचे - हनुमान दर्शन
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
हे गुणवंता देशिलका दर्शन आता ॥ध्रृ॥
सकाळी यावे डोकवावे मंदिरात
तू असो वा नसो घालावा दंडवत
उकल करावे आत्म्याचे मनोगत
पडताळूनी पहा सत्यता ॥१॥
आजवरी मी बरीच दु:खे भोगली
कर्म म्हणूनी ती सर्व सहन केली
हे मी न कधीच तुजला सांगितली
शेवटी गातसे मी ही गाथा ॥२॥
तू शक्तीवान बलाढ्यसा रामदास
मी असे पामर झालो आज उदास
किती काळ असा भोगावा वनवास
तूची माझ्या जीवनाचा त्राता ॥३॥
नित्यरोज आराधना देवपूजन
कष्ट त्याग करतो पाळुनी बंधन
तरीही नशीब मागे शनी बनुन
सुचेना काय करावे आता ॥४॥
परसुखात मी मानतो समाधान
सतकार्य धर्मासाठी त्यागी जीवन
परोपकाराने सुखावेल का मन
हे उलगडेना भगवंता ॥५॥
हा दु:खी देह शेवटी कसाही जावो
आपल्या हातून अपवित्र न होवो
ह्या हृदयाच्या चिंधडया होऊन जावो
साष्टांग वंदन श्रीसमर्था ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP