स्वर अंतरंगाचे - उजनी
काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड
तू अन्नदात्री माऊली ॥ध्रृ॥
कोठून आली तुझा जन्मदाता कोण
कोठे जाणार ठावे आहे का ठिकाण
तुला पाठविले शेतकर्या भेटाया
जिल्हा सुजलाम सुफलाम कराया
तू फायदेमंद झाली ॥१॥
भाग्योदय झाला उजनी या गांवात
चंद्रभागेच्या पवित्र जलाशयात
सोलापूर जिल्हा नाचे आनंदात
येथेच्छ असे हे जीवन जीवनात
तुजला येथे आडविली ॥२॥
आपले यशवंतराव पूजनाला
त्यानी आळविले प्रभू विठ्ठलाला
येथे आडवी आपल्या चंद्रभागेला
माफी करावी आम्हा विनंती तुम्हाला
विठ्ठलाशी प्रार्थना केली ॥३॥
काहीना वाटले गंडांतरा संसारा
शेते गेली घरे गेली कुलूप दारा
त्यांनी दु:खी मनाने त्याग केला सारा
उष:कालासाठी मिठी मारी तिमीरा
मराठी परंपरा आपली ॥४॥
आई मरावी परी मावशी उरावी
तसे धरणग्रस्त गेले अन्य गावी
जरी का मिळाले बंधू बहुस्वभावी
जशी पणती यावी चिमणी विझावी
ही कृतज्ञता दिसली ॥५॥
तू आज आम्हापर्यंत कशी पोचली
मी त्याची कहाणी सांगतो बुरीभली
ज्याला नव्हते होते त्याना तू दिधली
काही असती आरामात, काही गेली
तू समदर्शी माऊली ॥६॥
काहीनी बढी छोटी ठेकेदारी केली
त्यानी बरीच बोगस धन लुटली
सायकलीच्या जागी फटफटी आली
फटफटीच्या ठिकाणी जीप चालली
झोपडीची माडी बनली ॥७॥
येथेच्छ खाऊनी काहीना अपचन
तर काहीचे भूकेने व्याकुळ तन
काहीजण देती उष्टेअन्न फेकुन
पोटभरी त्या उष्टयावर काही दीन
यानी अन्ना ठोकर दिली ॥८॥
तू नसता सुने सुने उदास वाटे
आमच्या नयनात तुझे रुप साठे
तू येताच वाटे काळीज आम्हा भेटे
तुझ्यावरील प्रेम कदापी न हटे
तू तारक माऊली ॥९॥
शेवटी तूही आहेस दैवा अधिन
तुझे जीवन घननिळाच्या स्वाधीन
तो आपला राजा त्याचे हाती जीवन
त्या कृपावंत राजाला माझे वंदन
हीच श्रीस्वामी माऊली ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2023
TOP