(साकी)
दुसरे दिवशीं प्रातःकाळीं नित्य विधी सारुनी ।
सोमकांत नी भृगू तापसी बैसती हे सदनीं ॥१॥
धृ० सुन सुन भूपा हे । पूर्वजन्मकथना हें ।
पूर्वजन्मिंचें चरित्र कथिती सोमकांत भूपातें ।
मनापासुनी चित्त देउनी श्रवण करी कथनातें ॥२॥
विंध्यपर्वतासंनिध आहे एक नगर कोल्हार ।
चिद्रुपनामा वैश्य असे तो धनिक सावकार ॥३॥
सुभगा नामें त्याची भार्या पतिव्रता व्रतनेमी ।
रुपगुणांनीं तशी शिलानें उत्तम वर्तन नामी ॥४॥
त्या उभयांसी वृद्धपणीं सुत एकुलता एक ।
कामंद नामें अती लाडका करिती बहु कौतुक ॥५॥
त्या सूताचें एक तरुणशी युवती आणुनियां ।
विवाह केला बहु थाटानें सुवेळ साधुनियां ॥६॥
पुत्रवधूचें नाम ठेविलें कुटुंबिनी ऐसें ।
पातिव्रत्यें वर्तन सतिनें साचहि केलें तैंसें ॥७॥
पति-वचनातें पाळुन सति ती पूजन करि देवांचें ।
तैसे अतिथी देव मानुनी पूजन करी कीं त्यांचें ॥८॥
या दंपत्या पुत्र सात नी कन्या होत्या पांच ।
कुटुंबिनी हें नाम यथार्थचि करिती झाली साच ॥९॥
पुढती चिद्रुप कांहीं दिवशीं कैलासासी गेला ।
सुभगापत्नी सती जाउनी रक्षितसे धर्माला ॥१०॥
(गीति)
नंतर कांहीं दिवशीं, कामंदानें समग्र धन हरिलें ।
उपदेशितां सतीनें, तिजला तातगृहास पाठविलें ॥११॥
कन्या आणिक पुत्रहि, आर्यालयीं धाडिलीं सतीसह तीं ।
स्थावर धन सारेंची, विक्रय करुनि न ठेविली माती ॥१२॥
धन संपतां तयाचें, कपटानें नगरवासि बुडविले ।
तस्करविद्येमध्यें, थोडया अवधींत नांव गाजविलें ॥१३॥
व्यभिचारपणामध्यें, जार अशा आणि वीर द्यूतांत ।
गरिबांस भेडसावी, शूर असें नांव गाजवी त्यांत ॥१४॥
बापाच्या वेळेचें, कर्ज उगविलें असत्य कर्मांनीं ।
गरीब दुबळया अबला, भोंदु नि द्रव्या हरीत अडवूनी ॥१५॥
कर्जी घेऊन धन तें, बुडवी लोकां न देइ परतूनी ।
ऐशा गोष्टी करण्या, भीत नसे तो कुकर्म वर्तूनी ॥१६॥
भूपाला लोकांनीं, कामंदाचे समस्त ते दोष ।
सांगितले ते ऐकुन, भूपाचा त्या क्षणींच हो रोष ॥१७॥
नगराच्या बाहेरी, घालविलें त्यांस फार कोपानें ।
कामंद वनीं जाउन, तेथें करि दुष्ट कर्म जोरानें ॥१८॥
नगरांतुन घालविलें, कामंदाला त्वरें अरण्यांत ।
तेथें जाऊन त्यानें, चालविली वाटमारि मार्गांत ॥१९॥
यापरि कामंदानें, तेथेंही बहु धनास मेळविलें ।
तस्कर नोकर ठेवुन, राजापरि राज्य तेथ स्थापियलें ॥२०॥
बहु धन खर्चुन तेथें, कामंदानें सुरेख गृह केलें ।
नंतर परिवारासह, पत्नीला त्या गृहास आणविलें ॥२१॥
नानापरि परिवारा, सजवुन त्यांना मुदीतसे केलें ।
नानापरि पक्वांन्नीं, सर्वांनीं तेथ भोजना केलें ॥२२॥
मन रंजविण्यासाठीं, रानांतिल श्वापदांस मारुन ।
मित्रांसह पारधही, करिता झाला वनांत भटकून ॥२३॥
ऐशापरि आनंदें, काल क्रमितां तयास विद्वान ।
त्याची भेटी होतां, मनगट धरिलें वनांत अडवून ॥२४॥
पंडित नामें होता गुणवर्धन हें यथार्थ नामा हें ।
उपदेशिलें तयाला, सोड म्हणे प्राण रक्षि ताता हे ॥२५॥
जर तूं माझा करशिल, घात तुला तर सहस्त्र कल्पवरी ।
नरकांत खास पडशिल, या गोष्टीचा विचार तूंच करीं ॥२६॥
अन्यायानें धन हें, मिळवुन करशी कुटुंबपोषण हें ।
पण याचें फल तुजला, एकाकी भोगणें असें साहे ॥२७॥