मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५८

उपासना खंड - अध्याय ५८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(ओवी)

इंद्र सांगे शूरसेनासी । तेचि कथा व्यासांसी ।

विधी सांगे रंजनासी । अवधान द्यावें सज्जनीं ॥१॥

हेचि कथा भृगुमुनी । सोमकांत आणि राणी ।

यांना सांगती निशिदिनीं । ऐकती तें भक्तीनें ॥२॥

(दिंडी)

शूरसेनाला शक्र कथा सांगे ।

शांत चित्तानें श्रवण करी आंगें ।

दंडकारण्यासमिप असे पूर ।

नाम नंदन हें ऐक नृपा थोर ॥३॥

बहुत पापी अत्यंत असे दुष्ट ।

नाम तैसेंची धिवर असे पुष्ट ।

लघू वय हें असत अशा काला ।

चौर्य करण्याची कुशलता तयाला ॥४॥

तया धिवराला तरुणपणा येतां ।

जारकर्मासी करित बहू होता ।

बघत बघतां तो चौर्य करी मोठें ।

शपथ घेणें हें कृत्य करी खोटें ॥५॥

करी उपरोधिक भाषणास खासा ।

सदा परक्याला त्रस्त करी ऐसा ।

द्यूत मद्यप हीं कृत्यं करी दोनी ।

व्यसन कूशल अत्यंत सौख्य मानी ॥६॥

तया धिवरानें नगरवासियांसी ।

त्रस्त केलें अत्यंत प्रकारेंसी ।

तया धिवराला हद्दपार केला ।

घोर कांतारीं त्वरित निघुन गेला ॥७॥

(इंद्रवज्रा)

कांतारमार्गीं जन जात त्यांस ।

हिरोन घेई तइं वस्तु त्यांस ।

छेदोन टाकी जन ते समस्त ।

अशींच द्रव्यें आणि होत मस्त ॥८॥

कांता कुमारा वसनादि वस्त ।

अर्पून त्यांना सजवून तुस्त ।

एके दिनीं तो करि पारधीला ।

जाई पशु मागुन दूर गेला ॥९॥

जाई पशू त्या चुकवून जेथें ।

लागून पायां तइं ठेच लागे ।

भूमीवरी तो पडला निचेष्ट ।

झाला असे सावध कीं च दुष्ट ॥१०॥

(पृथ्वी)

वनांत फिरतां सरोवर तया दिसे धीवरा ।

तयास अवलोकुनी करित मज्जनां घाबरा ।

हरुन श्रम पावला बहु सुखास तो धीवर ।

तयास कळलें नसे पुनित नीर हें तोंवर ॥११॥

मुनींस विधि सांगती मुनि गणेशकुंडांत हा ।

करी स्नपन तो निघे सदनिं जावया दुष्ट हा ।

करी श्रवण नाम हें मुखिं गणेश जो बोलतो ।

तयापुढति घेउनी असि करीं वदे मारतों ॥१२॥

अहो मुनि असें वदे धिवर तो करींची असी ।

गळून पडली घडे परमभक्त भेटी अशी ।

सुदर्शन घडे तया म्हणुन हो मती उज्ज्वल ।

हंसून पुशिलें तुझी असि पडे असें मुद्‌गलें ॥१३॥

असा परम-भक्त जो प्रथित नाम हें मुद्गल ।

म्हणे धिवर हो मुनी स्नपन तीर्थी त्या जाहलं ।

तसेंच अपुलें घडे मुनिवरा मला दर्शन ।

म्हणून तनु ही तशी मतिहि जाहली पावन ॥१४॥

असंख्य बहु पातकें करितसे लघू पासुन ।

प्रसाद अपुली कृपा मदिय ही विरक्ती मन ।

असे स-जिव मी करीं धरिं न शस्त्र कीं हा पन ।

अघां त्यजिन मी करा मजसि उद्धरा आपण ॥१५॥

(भुजंगप्रयात्)

अशा भाषणा ऐकुनी मुद्गलाला ।

दया येउनी तो म्हणे धीवराला ।

तुझ्या उद्धरासी तुला मी उपाव ।

कथीं मी अतां ऐक तूं पूर्ण-भाव ॥१६॥

असें बोलुनी ठेवि शीर्षास पाणी ।

वरा दीधलें मुद्गलें योग्य वाणी ।

गणेशाय यासी नमःजोड-मंत्र ।

तया धीवरा बोधिला हाच मंत्र ॥१७॥

मुनी रोविती भूमिसी एक काठी ।

तया सांगती साध्य मंत्रास साठीं ।

बसें येथ तूं मी पुनः येच पंथें ।

फुटे अंकुरीं यष्टि बा बैस येथें ॥१८॥

बसे एक ठायीं जपें एक ध्यानीं ।

प्रभूनाम घेईं निराहारिं पानीं ।

असें सांगुनी मुनी जात पंथें ।

बसों सांगती तो करी पाठ येथें ॥१९॥

बहू काल तो मंत्र पाठास बैसे ।

फुटे यष्टि ती अंकुरीं रोप जैसे ।

बघे वाट तो मुद्गलाची तिथेंची ।

बसे आसनीं तो बुडे वारुळेंची ॥२०॥

तया वारुळा वेलिंनीं वेष्टियेलें ।

तयामाजि त्याचें शरीरास झालें ।

पुढें त्याच ठायीं मुनी पातले ते ।

वनीं पाहती येउनी धीवरातें ॥२१॥

(गीति)

मुद्गल मुनी पहाती, धिवराच्या त्या तपास पाहून ।

आनंदयुक्त होती, काढिति स्वकरें खणून तें भवन ॥२२॥

मंत्रित उदकें सिंचुनि, सावध करिती तयास मुद्गल ते ।

पहिली काया जाउन, धीवर झाला गणेशरुपच तें ॥२३॥

इतुका प्रकार होतां, उघडी नयनांस जेधवां तपि तो ।

सन्मुख गुरुंस पाहुन, पुत्रापरि भेटला तयां तपि तो ॥२४॥

उघडी नयन तपस्वी, तेजानें युक्त देखिला अग्नी ।

मुद्गल स्वकीय तेजें, करिता झाला प्रशान्त तो अग्नी ॥२५॥

गणेश-रुपीं शिष्या जन्मे भवनामधून जाणून ।

केला पुनः तयाचा, नाम-विधी या रुपास पाहून ॥२६॥

भ्रूमध्यापासुन ती, शुंडा प्रसवे म्हणून भ्रूशुंडी ।

ऐशा नामें करुनी, नांवासी सार्थ ठेवि भ्रूशुंडी ॥२७॥

एकाक्षरमंत्र तया, देउन केलें मुनी असें प्रथित ।

पुष्कळ वर देउन त्या, वदते झाले तयास हा हेत ॥२८॥

इंद्रादी देव तसे, सकलांना पूज्यमान तूं होसी ।

एकाग्र मनें करुनी, स्तविला प्रभु जो गणेशनामासी ॥२९॥

यास्तव रुप तुझें हें, झालें म्हणुनी तुझेंच दर्शन जें ।

घेतिल त्यांच्या इच्छा, साग्र अशा पूर्ण होति हें समजे ॥३०॥

आयुष्य तुला लाभे, कल्प मितीनें मिळेल हें सत्य ।

ऐके भ्रुशुंडि आतां, वदतों मी सत्य होय हें उचित ॥३१॥

ऐसे प्रचूर वर हे, देउन मुद्गल गृहास ते जात ।

पुढती भ्रुशुंडि मुनि तो, पद्यासनिं बैसुनी तपा करित ॥३२॥

तपसामर्थ्ये त्यानें, निर्मियली मूर्ति ती गणेशाची ।

नामें करुन पूजा, शोडष-विधिंनीं करीतसे साची ॥३३॥

एणेंकरुन आश्रम, सुरम्य झाला म्हणून बहु प्राणी ।

वास कराया आले, सोडुन वैरास होत एक-पणीं ॥३४॥

जातां शंभर वर्षें, समीप आले गजानन प्रभु ते ।

देती वरास तेव्हां, भूपाला वृत्त सांगती जें तें ॥३५॥

जेथें तपसा केली, नमाल नामें पुनीत तें स्थान ।

होइल भ्रुशुंडि भक्तां, मूर्तीच्या दर्शनें नसे पुन्हां जनन ॥३६॥

करितां तपसा तेथें, सिद्धीला त्वरितशी फला लाही ।

अपुत्र पुत्रा लाभे, लभते विद्या अभिष्टय जो त्यांही ॥३७॥

ऐसें चरित्र आहे, मुद्गल वरदा भ्रुशुंडि मुनि त्याचें ।

अणखी विचार भूपा, सांगें मीं तुजसि जें यथा वाचें ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP