(गीति)
व्यासें विधीस पुशिलें, गणपतिनें शंकरास जीं कथिलीं ।
अपुलीं सहस्त्रनामें, तीं सांगें जनहितार्थ तूं वहिलीं ॥१॥
विघ्नविनाशासाठीं, गणपति तीं शंकरास कथितात
प्रस्तावनेस आधीं,म्हणणें हें तत्त्व मुख्य त्या विधिंत ॥२॥
गणपति दैवत आहे, छंदहि असती अनेक मंत्रास ।
गं हें बीज असे त्या, शक्ती ही तुंड योजिली त्यास ॥३॥
स्वाहा कीलक आहे, आरंभीं म्हणुन तो म्हणे मंत्र ।
विघ्न निवारुन तुष्टे, गणपति यास्तव पठेच हा मंत्र ॥४॥
प्रथम गणेश्वर ऐसें, गणक्रीड अशीं अनक्रमें नामें ।
नंतर अनंत नामा, अनंत श्री नी अनंत क्रम नामें ॥५॥
मुनि संस्थित हीं नामें, प्रभु सांगे शंकरास तीं व्यासा ।
पठतां प्रभातकालीं, सर्व सुखें लाभती मही-वासा ॥६॥
(इंद्रवज्रा)
आयुष्य लाभे पठतांच मंत्र ।
आरोग्य लाभे पठतांच मंत्र ।
आर्यत्व लाभे पठतांच मंत्र ।
आस्तिक्य लाभे पठतांच मंत्र ॥७॥
ऐश्वर्य लाभे पठतांच मंत्र ।
ओजास लाभे पठतांच मंत्र ।
औदार्य लाभे पठतांच मंत्र ।
कांतीस लाभे पठतांच मंत्र ॥८॥
कौशल्य लाभे पठतांच मंत्र ।
गांभीर्य लाभे पठतांच मंत्र ।
दाक्षिण्य लाभे पठतांच मंत्र ।
पांडित्य लाभे पठतांच मंत्र ॥९॥
विज्ञान लाभे पठतांच मंत्र ।
सामर्थ्य लाभे पठतांच मंत्र ।
सौंदर्य लाभे पठतांच मंत्र ।
सौभाग्य लाभे पठतांच मंत्र ॥१०॥
(गीति)
बल यश मेधा प्रज्ञा, शांति दया सत्य आणि कुल शील ।
तेज प्रताप आणी, वीर्य तसें स्थैर्य आणखी विमल ॥११॥
धनधान्याची वृद्धी, श्रद्धा लाभे तसेंच दातृत्व ।
मिळती पठणानें हीं, धर्मांतिल तत्त्वबोध गूढत्व ॥१२॥
ज्या ज्या देशामाजी, जपती हे नाम मंत्र जन तेथें ।
न पदे दुकाळ विघ्नें, टोळांची धाड आदिही तेथें ॥१३॥
जाती लयास विघ्नें, पठतां सदनीं वसेच लक्षूमी ।
एकंदरींत पठतां, फळती फळं हीं अनेक कथिलीं मीं ॥१४॥
दारिद्रयनिरसनासी, पठतां हें नित्य भावनेंकरुन ।
अवधी चार महांची, यजितां होतो बहूत धनवान ॥१५॥
वाणी गजाननाची, व्यासां सांगे परोपरारार्थ ।
भृगु भूपतीस कथिती, ती सांगें मी करुन पठनार्थ ॥१६॥
(दिंडी)
गणंजय हें नाम वदा वाचे ।
दुजें गणपति हें नाम असे साचें ।
तिजें नामचि हेरंब असे गोड ।
वदनिं वदतां पुरवितीहि कोड ॥१७॥
आणिक धरणीधर नाम वदा वाचें ।
महागणपति हें पांचवें हि साचें ।
षष्ठ सप्तम हीं यक्ष वरद नामें ।
वदनिं घ्यावीं तीं नित्य नित्य नेमें ॥१८॥
क्षिप्रसादन हें आठवें वदावें ।
असें संख्या कांऽमोघसिद्धि गावें ।
दशैकादश अमित मंत्र नामें ।
वदनिं चिंतामणि नित्य वदा भावें ॥१९॥
असें तेरावें विधी नाम सत्य ।
वदा चौदावें भक्तराज नित्य ।
सुमंगल तें आणि वदा बीज ।
अशापूरक हें पूर्ण करी चोज ॥२०॥
नाम सतरावें वरद असें ध्यावें ।
नाम शिव तें सतत मुखें ध्यावें ।
नाम नंदन हें कश्यपाद्ययुक्त ।
वचा सिद्धी हें करिल बरें मुक्त ॥२१॥
एकविंशति रुचिर अशीं नामें ।
त्यांत ढुंढी-राज वदा प्रेमें ।
सहस्त्रनामाचा पठन लाभ जो तो ।
एकविंशति हीं पठुन प्राप्त होतो ॥२२॥