(गीति)
यापरि विश्वामित्रें, उद्धरिलें चारुहासिनी भीमा ।
विधि व्यासांसी सांगे, भृगु सांगे भूपतीस हा महिमा ॥१॥
भीमसुतानें केला, ऋष्याश्रमिं जो प्रवेश भागून ।
त्या आश्रमांत राहे, नामें वाचक्नवी मुनी म्हणुन ॥२॥
त्याचि मुकुंदापत्नी, होती सुंदर बहूत रुपवती ।
नमितां मुनीस त्यातें, बैसे असनीं वदोन ते जाती ॥३॥
स्नानासाठीं गेले, इकडे झाला तृषीत भीमसुत ।
मृगया करुन थकला, जल मागे त्या सतीस तो विनत ॥४॥
(शार्दूलविक्रीडित)
तारुण्यें सम तो समान दिसतो कांती अती मोहिनी ।
पाहे त्या पथिका मुनी सति तदा कामानळें मोहुनी ।
बोले राज-सुता तुम्हांस बघुनी कामानळें मानसी ।
प्राशी या अधरामृतास मजसी शांती करा योग्यशी ॥५॥
ऐकूनी वचसा सखेद मनसा क्रोधें तिला तो वदे ।
रुपाचा तुजला असेल बहुसा गर्वें जरी तूं वदे ।
आहे व्यर्थ तुझा नसे मम मनीं वांच्छा तरी कामिनी ।
मानीं मी परकी सती मम जशी माता तशी भामिनी ॥६॥
आहे आर्त असा तृषीत परि मी ने घे करींचे जला ।
आहे आश्रम हा म्हणून बसलों वाचक्नवी बोलिला ।
जावें येथुन हें बरें दिसतसे बोलूनियां चालिला ।
जातां ति धरित्ये करास वदते कार्यार्थ हो बोधिला ॥७॥
जो कोणी धरितो बळेंच परकी भार्या करीं तो नर ।
जाई सत्वर तो पडेच नरकीं ऐके तरी भू-वर ।
जी नारी सहजीं गळां पडतसे नाहीं तया पातकें ।
पूर्वी दोन युगीं स्त्रियांस दिधलें स्वातंत्र्य भू-चालकें ॥८॥
या वेळीं मजसी जरी विमुखशी केल्यास रक्षा तरी ।
होईं बा तुजसी पदच्युत करी राज्यांतुनी सत्वरीं ।
ऐसें बोलुन कोडगेपणिंच ती आलिंगना देतसे ।
भूपें लोटुन दीधल्यावरि पडे मूर्छीत ती होतसे ॥९॥
(गीति)
सावध झाल्यावर तो, बोले तूं पापकर्म हें केलें ।
नरकाचें साधन हें, अविचारें तूं करुन हें केलें ॥१०॥
सागर सुकेल अबले, परि माझें मन कधीं न तत्पर तें ।
दुर्वर्तन करण्यासी, नाहीं होणार सांगतों मी तें ॥११॥
धिक्कारितां मुकुंदा, क्रोधें संतप्त जाहली फार ।
देते शाप तयाला, ऐकें भूपा मनीं विचार कर ॥१२॥
ज्या अर्थी तूं माझ्या, दिधले बहु मानसीं असे कष्ट ।
त्या अर्थीं सर्वांगीं तुजसी होवो वदे नृपा कुष्ठ ॥१३॥
रुक्मांगद दुःखानें, आश्रम सोडी त्वरें निघे पाहें ।
काया बकापरी ती, निस्तेजें धवल जाहली आहे ॥१४॥
(हरिणी)
कवण अपराधा मीं केले कथीच गजानना ।
जवळ आणिलें या दुष्टेच्या कशास गजानना ।
हनन करिसी दुष्टांचें हें प्रथीत गजानना ।
अधम अबला ठेवी जीता कशास गजानना ॥१५॥
कनकतुलिता काया माझी अशी कशि जाहली ।
कथन करिं तूं माझीं पापें कशीं कशिं जाहलीं ।
बहुत पुशिलें देवा आतां कृपा करिं माउली ।
विनित वचनें मागें देवा नमीं तव पाउलीं ॥१६॥
(ओवी)
कर्ता करविता देव । भक्तांवरी असे भाव ।
शरणांगता अनन्यभाव । इच्छेपरी करावें ॥१७॥
ऐशापरी या तनूसी । घेऊन जावें जनांपाशीं ।
लज्जा वाटते मानसीं । नगरीं न जावें कीं ॥१८॥
प्रायोपवेशन करुन । त्यागीन देह बसोन ।
वटाखालीं जाऊन । बसतसें निराहारी ॥१९॥
(गीति)
रुक्मांगदाबरोबर, आले होते बहुत पारधि ते ।
कांतारीं त्या शोधिति, सायंकाळीं निराश होती ते ॥२०॥
नगरामध्यें गेले, आले होते समस्त सांगाती ।
न्यग्रोधतळीं बैसे, रुक्मांगद निश्चयें भृगू कथिती ॥२१॥