(शार्दूलविक्रीडित)
व्यासानें पुशिलें विधीस वहिलें सांगा कथा आणखी ।
सृष्टीचे जननास सांगत विधी व्यासांस तेव्हां मुखीं ।
सृष्टीच्या जननास हो गणपती सांगे मला कार्य हें ।
निर्मी मानस सात पुत्र मग मी कार्यार्थ योजीत हें ॥१॥
(गीति)
गौतम कश्यप आणिक, जमदग्नी अत्रि हे असे चौघे ।
विश्वामित्र वशिष्ठचि, भारद्वाज प्रसिद्ध हे तीघे ॥२॥
सुविद्य सर्वहि होते, पुशिलें मजला सख्या असें त्यांनीं ।
आम्हांस जनित केलें, कारण हें सांगणें विनित वचनीं ॥३॥
सृष्टी रचण्यासाठीं, आज्ञा दिधली तयांसमीं व्यासा ।
तेव्हां कश्यप मुनि तो, प्रथमारंबिं सुरु करी तपसा ॥४॥
एकाक्षरि मंत्रानें, जप केला मग गणेश नामाचा ।
वर्षे सहस्त्र संख्या, कायावाचामनें असा साचा ॥५॥
गणपति प्रसन्न होउन , दर्शन दिधलें तयास कीं त्यानें ।
मागे वांच्छित वर तो, देई तुजला असें वदे सु-मनें ॥६॥
कश्यप वदे गणेशा, तुजसा मजला सु-पुत्र कीं देईं ।
ऐकुन कश्यपवाणी, सृष्टी रचणें वरास हें देई ॥७॥
आणिक तुजला वदतों, संकट-समयीं करीन सांभाळ ।
ऐसें ऐकुन कश्यप, प्रभुचरणीं ठेवि आपुलें भाळ ॥८॥
सृष्टी जनीत होण्या, कश्यप करि कामिनी अहो चवदा ।
नाम दिती अदिति नी, कद्रू विनता दनू अशा चवदा ॥९॥
दिति जन्मे दैत्यांसी, आदिती उदरीं जनीत हे देव ।
दनुच्या उदरीं दानव, कद्रु प्रसवे अहींस सद्भाव ॥१०॥
विनता प्रसवे सूता, अरुणा वरुणा अणीक गरुडास ।
इतर स्त्रिया प्रसवती, सृष्टीमधल्या समस्त वस्तूंस ॥११॥
सृष्टी पाहुन ऐशी, कश्यप झाला बहूत आनंदी ।
अपुल्या पुत्रा त्यानें, गणेश मंत्रास दीधलें नगदीं ॥१२॥
एकाक्षर चतुराक्षर, पंचाक्षर नी दशाक्षरी मंत्र ।
द्वादश षोडश तैसा, अष्टादश-अक्षरी असे मंत्र ॥१३॥
उपदेशी कश्यप तो, जपती मंत्रांस तेधवां सूत ।
निश्चयपूर्वक जप ते, करिते झाले यथाविधी त्वरित ॥१४॥
नानाविध देशांसी, गेले बसले निवान्त वनिं-सूत ।
भजते झाले तेथें, रुचती रुपा धरुन चित्तांत ॥१५॥
देवांची वर्षे तीं, सहस्त्र संख्या मिती अशी तपसा ।
करिती तपसा सुत ते, देती दर्शन तया प्रभू मनसा ॥१६॥
सर्वांनीं गणपतिला, स्तविलें व्यासां परोपरी भावें ।
वाटे कवीस गावें, गणपतिचें चरितही मनोभावें ॥१७॥