संकष्टी चतुर्थी व्रताचा उद्यापन विधि :-
हा विधि ब्रह्मदेवानें कृतवीर्यास सांगितला होता. तोच इंद्रानें शूरसेन राजास कथन केला. व्रतोद्यापनाचा काल पहिला, पांचवा अगर सातवा हे महिने होत. व्रतोद्यापनाच्या दिवशीं श्रीगजाननाची विधिपूर्वक पूजा करावी. चंद्राला अर्घ्य द्यावें. उत्तम अन्नाचा नैवेद्य दाखवावा. याप्रमाणें पूजा करावी. नंतर आचार्यवरण, करुन ऋत्विज होमास बसवावे. गणानां त्वा० या मंत्राचा १०,००० होम करावा. तसाच आणखी हजार, पांचशें किंवा १०८ दूर्वांनीं होम करुन, बलिदान करावें व पूर्णाहुति वसोरधारा द्यावी. नंतर ब्राह्मणभोजन झाल्यावर गजाननाची वरील कृत्यांत न्यूनाधिक्याबद्दल क्षमा मागावी. अशा प्रकारें उद्यापन करावें म्हणजे अश्वमेधाचें पुण्य मिळतें.
अर्घ्याचा मंत्र :
आचम्य, प्राणानायम्य, अद्य पूर्वोचरित० फलप्राप्त्यर्थम्
रोहिणीसहित चंद्रमाप्रीत्यर्थम् अर्घ्यप्रदानं च करिष्ये ।
विधि : रक्तचंदनयुक्त पाणी, अक्षता व दूर्वायुक्त अर्घ्य द्यावें.
मंत्र :
क्षीरोदार्णवसंभूतो लक्ष्मीबंधो निशाकरो ग्रहानार्घ्यम् मया दत्तं रोहिण्यासहितः शशिः ॥
रोहिणीसहित चंद्रमादेवताभ्यो नमः
म्हणून अर्घ्य चंद्रावर द्यावें.
(साकी)
इंद्रें कथिलें कथन ऐक हें शूरसेन भूपाला ।
पुत्रासाठीं व्रत हें केलें उद्यापनिं अनुसरला ॥१॥
धृ० ॥सुन सुन भूपाळा प्रभुची अगम्य लीला ।
हवानासाठीं सुंदर मंडप उभवी बहु विस्तीर्ण ।
तेथें चाले पुराणवाचन वेदांचेंही पठण ॥२॥
गायन वादन नृत्य आदि कीं रंजवि त्यांना भूप ।
या समयीं बा कृतवीर्यानें अन्नदानही अमुप ॥३॥
भक्षुनि अन्ना तृप्त जाहले अंध दरिद्री राया ।
या पुण्यानें गर्भवती ती कृतवीर्याची जाया ॥४॥
दशमासांनीं पुत्र जाहला मुदित बहु कृतवीर्य ।
अनुकुल समयीं मौजीबंधन करिती विद्वद्वर्य ॥५॥
नंतर पुत्रा राज्य देउनी तपसा केली बहुत ।
या योगानें मुक्त जाहला ऐक ऐक ही मात ॥६॥