मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ८४

उपासना खंड - अध्याय ८४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

व्यास पुसे त्या विधिला, अचरे तप परशुराम तें स्थान ।

विष्णू-सुत त्यास म्हणे, मयुरेश्वर नाम तें असे स्थान ॥१॥

कमलासुर नांवाच्या, असुराचा वध इथेंच गणनाथें ।

केला होता पूर्वी, तारक नामक असूर तप येथें ॥२॥

तारक यास विधीनें, अभय दिलें त्या प्रसन्न होऊन ।

देव ऋषि यक्ष तसे, राक्षस गंधर्व यां दिकांकडून ॥३॥

आणखि वदे विधी त्या, जन्मा येईल सूत शंभूचा ।

कार्तिकस्वामी नामें, वध होइल त्याकडून हा साचा ॥४॥

(शार्दूलविक्रीडित)

दैत्यांसी वर हा मिळे तदुपरी माजे वरानें अती ।

त्रैलोक्यास बहू छळे अनितिही माजे तदा फार ती ।

सारे ते मुनि एक होउन तपा बैसोन एक स्थळीं ।

नेमानें करिती कळे असुर तो आला विधीच्या मुळीं ॥५॥

क्रोधानें विधि ताडिला हरि पळे शंभू लपे पर्वतीं ।

भीतीनें सुर हे पळोन मग ते गेलेचि त्या पर्वतीं ।

दैत्यानें दिधली मुरांस अवधी सत्ताच ही भूवरी ।

झाला निर्भय यापरी असुर तो वर्ते सुखें यापरी ॥६॥

(पृथ्वी)

मुनी तप करीत हें बहुत काल एकाग्र ते ।

बघून वदती प्रभु मग विहायवाणीस ते ।

शिवास सुत होउनी करिल नाश हे बोलिले ।

असें श्रवणिं ऐकुनी सकल ते ऋषी पातले ॥७॥

परंतु शिव हा नसे पळुन जात कीं पर्वतीं ।

स्तवीत सुरही मुनी बहुत भक्तिनें पार्वती ।

धरीत रुप भिल्लीणी भुरळ त्या पडे योगिया ।

असे सुरुप साजिरी नटतसे शिवा अंगिंया ॥८॥

शिवासह मुनी तसे सुरहि पातले वीवरीं ।

तपांत शिव हा असे बघति ते समाधी पुरी ।

तयांस भय वाटलें क्रुधित होति ती भंगतां ।

स्थिती बघुन जाळिती त्रिभुवनास ते तत्त्वतां ॥९॥

अशी बघुन ती स्थिती मलिन जाहलीं तीं मुखें ।

शिवा वदत त्या अतां मदनबाण वेधी मुखें ।

समाधि उतरे तदा खचित कार्य हें होइल ।

म्हणून मदना करी मदत ही फळा येइल ॥१०॥

म्हणे मदन हें असें कठिण कार्य सर्वांस तो ।

तथापि करितों शिरीं धरुनि हें असें बोलतो ।

धनूस करिं घेतलें सुरवरादि कार्यास ते ।

शिवाजवळि पातला मदन तो पुढें ऐक तें ॥११॥

कथी विधि मुनी कथा श्रवण ती करी प्रीतिनें ।

भृगू कथिति ही नृपा श्रवण तो करी भक्तिनें ।

सुकोमल तशी शमी हरित ही स्वयें आणुनी ।

मयूरसुत हा करी कवन मंजिरी अर्पुनी ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP