(साकी)
सुरवर वचना ऐकुन तेव्हां शोध करी भूपाळ ।
संकष्टीचें व्रत हें ज्यानें आचरिलें तें सकळ ॥१॥
धृ०॥सुन सुन भाईजी वृत्त तुम्हि कहोजी ।
शूरसेन हा शोधासाठीं पाठवि नगरीं दूत ।
इतुक्यामध्यें विमान दिसलें दूतांना अवचीत ॥२॥
देवदूत हे विनाम घेउनि आले कां हें पुसती ।
गलत्कुष्टशी चांडाळिण ही आहे तिजला नेती ॥३॥
ऐसी वार्ता कळतां त्यांना राजदूत हें वदत ।
हीन जातिची नारी असुनी पुण्य नसे कळत ॥४॥
ऐसें असतां विमान घेउन आलां हें कैसें ।
देवदूत हे पूर्वजन्मिंचें वृत्त सांगती ऐसें ॥५॥
(गीति)
बंगाल देश आहे, त्या देशीं धनिक वीर जातींत ।
सारंगधर नाम असें, होतें हो राजदूत त्या प्रथित ॥६॥
दुहिता सुंदर त्याची, नाम असे सुंदरी तिचें साचें ।
लग्नाअधींच बहु करी, पुरुषांशीं सुरत खेळ मदनाचे ॥७॥
कळतां मात पित्याला, योजी वर चित्र नाम तो तरुण ।
पर-पुरुषीं रतण्याची, हौस असे निंद्य निंद्य आचरण ॥८॥
सुंदर वेष करुनी, गेली सुंदर वराकडे रमणी ।
पाहे पती तियेला, धिक्कारी जातसे पुढें रमणी ॥९॥
मद्यापाना करुनी, मदनानें धुंद ती असे ललना ।
पतिच्या उरांत खंजिर, मारी हें घोर कृत्य करि हनना ॥१०॥
पतिचें सुदैव मोठें, वांचुनि तो सासर्याकडे गेला ।
वृत्तान्त त्यास सांगे, कन्येचें कृत्य पाहता झाला ॥११॥
पर-सदनाहुन येउन, महलीं शिरली असे स्वयें पाहे ।
कन्येचा वध करण्या, भृत्या आज्ञा करीच लवलाहें ॥१२॥
भृत्यें तियेस वधिलें, पाप तिचें पूर्ण जाहलें ऐका ।
यास्तव जन्म तियेचा, वंशीं या जाहला पुढें ऐका ॥१३॥
अंगीं व्याधी जडली, मद्यानें धुंद जाहली पडली ।
चंद्रोदयींच उठली, प्रभुभक्तांच्या गृहास ती गेली ॥१४॥
भोजन केलें तेथें संकष्टीचें अजाण व्रत घडलें ।
नाम मुखीं श्रीप्रभुचें आले म्हणुनी विमान पाठविलें ॥१५॥
(कामदा)
ऐकुनी असें वृत्त तोषले । राजदूत ते त्यांस बोलले ।
वृत्त हें खरें सांगतां जरी । तीस न्या तुम्हीं राजमंदिरीं ॥१६॥
बोलिले तयां देवदूत हें । ज्ञापिलें नसे देवभाष्य हें ।
स्थापिती तिला दूत वाहनीं । देह हा तिचा शुद्ध पाहुनी ॥१७॥
वृत्त हें कळे सेवकामुखीं । पूर जातसे ऊर्ध्व तें सुखी ।
शूरसेन हें पाहतो स्वयें । दृष्टि देखिलें थक्क तो स्वयें ॥१८॥
(भुंजगप्रयात्)
विमानांतुनी पाहते शुद्ध जाया ।
विमानास पाहे स्वयें ती रमाया ।
तिच्या दृष्टिपातें चढे इंद्रपूर ।
बघे भूपती चोंज हें सत्त्वधीर ॥१९॥