मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय १०

उपासना खंड - अध्याय १०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(ललित)

सोमकांत बा कथन हें करी ।

सांगती मुनी श्रवण सादरीं ।

अंशभूत हे असति व्यास जे ।

मूळ विश्व हें तदिय रक्षिजे ॥१॥

एक वेद हा प्रणित ईश्वर ।

चार-भाग जे चतुर सागर ।

व्यास तो करी सुलभ अर्थ हा ।

जाणण्यास तो करित यत्‍न हा ॥२॥

यापुढें तया बहुत गर्व ये ।

ज्ञानसाधना मज सरी न ये

स्वकृती रची प्रमुखशा कथा

पूर्वकालच्या घटितच्या कथा ॥३॥

त्यांत विघ्न हें जनित तें न हो ।

ईशपूजना प्रथम तें अहो

व्यास तें न करि यास्तव ।

भ्रांत जाहला विसरला स्तव ॥४॥

वेद अर्थ जो उघड सांगतो ।

बुद्धिमांद्यता त्वरित पावतो ।

मंत्र औषधी करित कुंठिता ।

सर्व पावती बहुत धीमता ॥५॥

त्या परी मती भ्रमित होतसे ।

व्यास जाहला भुजग हें जसें ।

भ्रांत व्हावया कवण कारण ।

ध्यानीं येइना म्हणुन आपण ॥६॥

ऐक भूपती श्रवण यापुढें ।

व्यास चालिला विधिपुराकडे ।

काय जाहलें म्हणुनियां पुसे ।

व्यास दीनसा कमल-जा दिसे ॥७॥

(शिखरिणी)

विधाता व्यासासी उठुनि लवलाही निज करें ॥

धरुनी सत्कारीं कुशल तव आहे बहु बरें ।

विधात्यासी व्यासें नमन करुनी त्यासि पुशिलें ।

कलीमाजी आतां सकल मनुजें पाप वरिलें ॥८॥

असें देखोनीयां मजसि बहु दुःखेंचि पिडिलें ।

तरी आतां त्यांना करुनि बहु बोधास वहिलें ।

कथोनी लोकांना सुखद बहु तो मार्ग बरवा ।

धरुनी जाती ते पुनित अवघे पावति रवा ॥९॥

असे कैसे होती सकल जन हे नास्तिक बरें ।

कशी वेदांची ते जन करिति निंदा विधि बरें ।

तसा लोकांचा हा सकल सुटला धार्मिक विधी ।

नसे त्यांना देवा तिळभर तरी बंधन-विधी ॥१०॥

असें ध्यानी येतां रचित असतां वेद-मथनीं ।

निघे अर्थाचें तें नवनित पुराणें हि कथनीं ।

परी माझी झाली मतिच अवघी कुंठित अशी ।

तरी माझी ऐसी गति कवण काजीं स्थित कशी ॥११॥

विधी-देवा तूं हें सकल बघसी जाणसि असें ॥

म्हणूनी आतां मी शरण तव पादीं विनतसें ।

कधीं देवा मातें मजकडुन जें कारण घडे ।

कधीं देवा मातें कवण गुण यत्‍नें चि वरपडे ॥१२॥

असें ऐकूनी तो मनन करितो प्रेमळ मनीं ।

वदे व्यासालागीं नवल बहु तें वाटत मनीं ।

गणेशा आरंभीं स्मरण नच केलेंस पहिलें ।

असे गर्वानें तें तुजकडून हें कार्य घडलें ॥१३॥

(शार्दूलविक्रीडित)

गर्वानें अथवा मनांत कपटें द्वेषेंच कीं चालणें ।

धीटाई करुनी अशाच इतरीं दुर्वर्तना सोडणें ।

वर्तें लीनपणें तसेंच स्मरणें ईशास या प्रार्थणें ।

यासाठीं पहिला विवेक करुनी कार्यास कीं लागणें ॥१४॥

गर्वासी धरितां स्वकार्य करितां नाशास तें पावतें ।

युक्तीनें विनयें स्वकार्य करितां सिद्धीस तें पावतें ।

गर्वानें बलभीम रामसदनीं सेवेकरी जाहले ।

द्वेषानें अवघ्या कुलासह कसें दुर्योधनें नाशिलें ॥१५॥

द्वेषानें जमदग्नि-सूत अवघे क्षत्रीय संहारिता ।

सृष्टीच्या जनिता तसाच भरिता संहारिता रक्षिता ।

ऐसा चालक त्या प्रभूस नमुनी कार्यास कीं तत्पर ।

मी ब्रह्मा हरि शंकरासह तिघे त्याचेच हो किंकर ॥१६॥

हे व्यासा तव गर्व फार करुनी आधींच विघ्नेश्वरा ।

प्रार्थूनी रचण्या पुराणकथना आरंभ नाहीं खरा ।

यासाठीं स्मरुनी अधीं पुढति तूं कार्यास विघ्नेश्वर ।

आरंभी मग तें यशेंचि सहजें सिद्धीस जाई तर ॥१७॥

(ओवी)

गजानन हेंचि परब्रह्म । शरण रिघतां नासे भ्रम ।

इच्छा पूर्ण करील उत्तम । म्हणोन गजानन स्मरावा ॥१८॥

जरी केवळ स्मरणावांचुनी । वससी हजारों वर्षें मेदिनीं ।

तरी व्यर्थचि श्रमोनी । कासया यश पावसी ॥१९॥

(गीति)

ऐसें ऐकुन व्यासें विधिस म्हणे मोह फार मज झाला ।

आतां मजला कांहीं सुचत नसे तरि उपाय कथीं मजला ॥२०॥

श्रीमद्गणेश कोण नि रुप कसें तें यथार्थ सांगावें ।

होईल ज्ञान कैसें पूर्वीं कवणा प्रसन्न सांगावें ॥२१॥

अवतार किती झाले, हें सांगावें समग्र करुणाब्धी ।

तुजला शरण मि आलों, देईं देईं त्वरीत ती शुद्धी ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP