(गीति)
हिमगिरि गिरिजा पुसतां, कथन करी एक ऐक इतिहास ।
व्रत हें नभ मासांतिल शुद्ध चतुर्थी पुनीतसा दिवस ॥१॥
कैलास पर्वतावरि, गण परिवारासहीत शिव बैसे ।
कथणें कथामृताला, षण्मुख पुसती पित्यास मधुवचसें ॥२॥
सिद्धिप्रद व्रत सांगे, आचरण्या सुलभसें बहू ताता ।
ऐकुन वचना शिव तो, वरद-विनायक व्रतास हो कथिता ॥३॥
सर्व व्रतांत उत्तम, सुलभ असें हें म्हणून सांगतसें ।
जप-तप-होमादि तसें, दानाचें ही अवश्य त्यास नसे ॥४॥
नभ-मास शुद्ध पक्षी, चवथीला स्नान आदि सारुनी ।
जावें गुरुकडे मग, पूजावें त्यांस देव मानूनी ॥५॥
नम्रपणें त्यांपाशीं, वरद विनायक व्रतास मागावें ।
उपदेशितां गुरुंनीं, व्रत करण्याला त्वरीत लागावें ॥६॥
(शार्दूलविक्रीडित)
धात्री तीळ कुटून चूर्ण करुनी अंगास लावूनियां ।
जावें शुद्ध जलासमीप मग ही स्नानादि सारुनियां ॥
पूजावा मग तो विनायक यथा शास्त्रापरी नेम तो ।
पाळावा शुचि राहुनी दिवस तो सांगे सुता शंभु तो ॥७॥
किंवा नेम करीं व्रतार्थ विधिनें शास्त्रापरी वर्तुनी ।
आरंभा करिं श्रावणांत चवथी शुद्धा तिथीपासुनी ॥
पाळीं नेम असा नभांत चवथी शुद्धा तिथी तोंवरी ।
नेमें पूजन जो करी सतत तो मुक्तीस घे सत्वरीं ॥८॥
(गीति)
षण्मुख पुसे शिवाला, एतद्विषयीं कथाच इतिहास ।
शंभू तयास सांगे, ऐकें वत्सा पुढील कथनास ॥९॥
पूर्वीं भूपति होता, कर्दम नामें समुद्रवलयांकी ।
रक्षी भूस सुखानें, भृगु आले त्यास भेटण्या ते कीं ॥१०॥
(भुजंगप्रयात्)
भृगू पुजिलें कर्दमें आदरानें ।
पुसे त्याजला प्रश्न हा शांततेनें ॥
घडो पूर्वजन्मीं असें पुण्यकाय ।
मिळे राज्य मातें नसे या अपाय ॥११॥
भृगू सांगती वृत्त हें पूर्वजन्मीं ।
असे क्षात्रधर्मी परी दिन जन्मीं ॥
असें शुद्ध कर्मीं प्रपंचीं निमग्न ।
नसे सौख्य तूंतें कुटुंबीं कृतघ्न ॥१२॥
बहू दुःख झालें म्हणूनी अरण्यीं ।
रिघे तेथ तूं रे भ्रमें त्या अरण्यीं ॥
तुझ्या दैवयोगें तिथें सौभरीय ।
मुनी दर्शनाचा तुला लाभ होय ॥१३॥
तया सांगतां आत्म वृत्तास भूपा ।
तुला सांगती योग्यसा नेम सोपा ॥
असे नेम हा पूजणें श्रीगणेश ।
वरें तूजला पूर्ण येईल येश ॥१४॥