(गीति)
रुक्मांगदास शोधित, त्याची सेना तिथें नृपा आली ।
अपुला स्वामी भेटे, हें पाहुन ती तिथें मुदित झाली ॥१॥
स्वामीचा देह तया, दिसला आतां विरुपसा कुष्ठी ।
ऐसें पाहुन सेना, दुःखानें जाहली बहू कष्टी ॥२॥
ऐसी दशा कशी हो, कारण सांगा तुम्हांस ही आली ।
सांगे रुक्मांगद तो, लोकांना गोष्ट पूर्विची घडली ॥३॥
नारद अनुग्रहें मी, जातों आतां कदंब नगरास ।
चिंतामणीतडागीं, मज्जन करितों स्व-देहशुद्धीस ॥४॥
तुम्ही चला बरोबर, तीर्थामाजी करा तिथें स्नान ।
पापक्षयार्थ तेथें, शक्तीपरि तें करा तुम्हीं दान ॥५॥
सारुन स्नानविधीला, जाऊं अपुल्या पुरांत परतून ।
ऐकुन भाषण त्याचें, आनंदें जात त्यास अनुसरुन ॥६॥
चिंतामणितीर्थाचें, सर्वांनीं स्नान पान मग केलें ।
झालें दिव्य शरीरीं, इतुक्यामध्यें विमान तें दिसलें ॥७॥
कोटी रवीप्रमानें, तेजोमयशीं बहूत आणियलीं ।
गणेशदूतीं खालीं, गगनांतुन तीं त्वरीत उतरविलीं ॥८॥
रुक्मांगदें तयाला, वंदुन पुशिलें किमर्थ आलांत ।
रुक्मांगदास कथिती, कारण ते धन्यवाद देतात ॥९॥
चिंतामणितीर्थाचे ठायीं, तूं स्नान दान तें केलें ।
तैसें गणेशपूजन, भावें केलें म्हणून पाठविलें ॥१०॥
(भुजंगप्रयात्)
अहो दूत हो पातला येथ आतां ।
परी यावया शक्य नाहींच आतां ।
घरीं वाट माझी बघे तात-माता ।
प्रभू पूजनासी करी नित्य ताता ॥११॥
अधीं मुक्त तीं जाहलीं पाहिजे कीं ।
पुढें मी सुखें येतसें देवलोकीं ।
असें ऐकुनी बोलती देवदूत ।
तुझी कामना पूर्ण व्हावी त्वरीत ॥१२॥
म्हणूनी करीं तूं पुन्हां स्नान येथ ।
तयासी समर्पी करीं पुण्य येथ ।
असें केलिया मुक्त होतील दोघें ।
तुझ्या संगतीं साच नेऊंच दोघें ॥१३॥
(कामदा)
ऐकुनी असें दूतभाषण । मूर्ति दो करी पुत्र आपण ।
दर्भ आणिले याच कारण । बोलतो पुढें भीमनंदन ॥१४॥
कूश तूं असे कूशनंदन । निर्मिले विधीं सृष्टिकारण ।
स्नान घालितो मोक्षसाधन । बोलतो तया भीमनंदन ॥१५॥
दर्भ मूर्तिला स्नान घालितां । मोक्षसाधना पात्र व्हा अतां ।
हेतु हा धरीं भीमनंदन । मंत्र हा म्हणे मोक्षसाधन ॥१६॥
स्नान तें करीं तीर्थ त्याजलीं । पुण्य तें दिलें तात-माउली ।
सेवकां पुसे भीमनंदन । वाहनीं बसे तूर्ण जाऊन ॥१७॥
चाललीं जवें सर्व वाहनें । पातलीं पुरा भीमनंदनें ।
पुण्य देउनी सर्वही जनां । तात-माउली मुख्य वाहना ॥१८॥
तीर्थमज्जनें पुण्य पावन । तोषला स्वयें श्रीगजानन ।
वाहनें बहू पाठवी पुरा । नेतसे प्रभू आपुल्या पुरा ॥१९॥