(पृथ्वी)
स्तुतीस बहु तुष्टले म्हणति त्या प्रभू कांक्षितां ।
तुम्हीं सकल जीं रुपें बघुनियां मला सेवितां ।
विधी-हरि-हरास जीं दिसलिं नाहिं तीं देखिलीं ।
म्हणून मम मानसीं वरद-भावना जाहली ॥१॥
तरी स्वमनिं जी असे रुचिर कामना इच्छिली ।
करुन पुरती तुम्हीं वरिहि घ्या कृपा ही भली ।
प्रभू वदति त्या मुनीवरहि मागुनी घेतले ।
विधी वदति हे मुनी मजहि वर्णितां भागले ॥२॥
अनंत जगिं जाहले भजक वर्णितां भागलों ।
अनंत वर दीधले कथुनियां मुखीं भागलों ।
गणेश वदले तदा वरद-वाणि ती ऐकती ।
करी श्रवण व्यास नी सकल भक्तही ऐकती ॥३॥
(स्त्रग्धरा)
तुम्हीं जें स्तोत्र केलें वर मदिय असे पाठका पूर्ण साचा ।
जे कोणी भावनेनें पठण करित ते तीन वेळां सु-वाचा ।
त्यांचीं सर्वत्र कार्यें त्वरित खचित तीं होति निर्विघ्न भक्तां ।
विद्यार्थ्यांनीं म्हणावें गणपति वर दे होइ विद्वान वक्ता ॥४॥
पुत्रार्थ्यानें म्हणावें झडकरि सुत त्या लाभ तो या विधीनें ।
नेमानें पाठ याचा प्रतिदिन पठतां एकवीसी मितीनें ।
त्यांच्या सर्वत्र इच्छा त्वरित सफल त्या होति कीं पूर्ण साच ।
ऐसा देऊन भक्तां वर गणपति तो गुप्त झाला तिथेंच ॥५॥
(गीति)
विधि सांगती पुढें कीं, सर्व उपासक अनेक मूर्तीस ।
स्थापन करुनी नामें, सुमुखादी एकदंत मूर्तीस ॥६॥
उत्तम उत्तम रत्नें, आणून त्यांनीं रचून मंदीरीं ।
मूर्ती स्थापित केल्या, बहुविध व्यासां तयांत त्याच तरी ॥७॥
वेंचक वेंचक नामें, घेउन केलें सहस्त्रनाम असें ।
त्यांतुन बारा नामें, घेउन रचिलें सु-पद्य एक असें ॥८॥
पूजेच्या आरंभीं, श्लोक म्हणावा असा असे पाठ ।
विद्येच्या आरंभीं विवाहकालीं स्मरोन हा पाठ ॥९॥
युद्धाच्या वेळीं नी, संकटसमयीं गृह-प्रवेशास ।
ग्रामीं जातेवेळीं, स्मरतां हरतें त्वरीत विघ्नास ॥१०॥
(दिंडी)
सोमकांताला कथन गणेशाचें ।
भृगू सांगति तें सुरस असे वाचे ।
ब्रह्मदेवानें व्यास-मुनी यांस ।
कथन केलें तें कथित असे खास ॥११॥
(उपेंद्रवज्रा)
उपसना-खंड कथून झाला । पुढें असे खंड दुजा नृपाला ।
तुझा असे भाव जरी कथीं मी । श्रवीं तरी साग्र पुराण नामी ॥१२॥
(शार्दूलविक्रीडित)
सूतांनीं कथिलें गणेशचरिता ऐकावया पातले ।
आले शोनक त्यांत मुख्य मुनि ते होते तिथें ते भले ।
सूतांनीं महिमा कथीत अवघा आराधनेचा तदा ।
केला हें कथिलें मुनींस विधिनें चित्तांत राहो सदा ॥१३॥
यासाठीं भृगु सांगती नृपतिला उद्धार व्हावा असा ।
हेतू हा धरुनी गणेशचरिता तो ऐकवी साग्रसा ।
जे कोणी श्रवणें करुन तरती संसारसिंधू पुरा ।
त्यांच्या सर्व विपत्ति दूर करुनी मोक्षार्थ दावी खरा ॥१४॥
(उपेंद्रवज्रा)
उपासना ही बहुसाल साची । गणेशसेवा चरणांबुजांची ।
यथामतीनें कवनें करुन । गणेशसेवा करवी मुखानं ॥१५॥
उपासनेचे शत सात न्यून । प्रसंग ग्रंथीं असती गणून ।
जापाकुसूमीं स्वकरींच माळा । करुन अर्पी प्रभुसीच भोळा ॥१६॥
गजाननाला रुचतीच दूर्वा । मंदार-पुष्पें नवश्वेत दूर्वा ।
शमी नवी कोमल लाल पुष्प । गजाननासी सु-जपाहि पुष्प ॥१७॥
गजाननाला चंदनरक्तयुक्त । तैसाच सिंदूर शिरीं प्रयुक्त ।
सतील लाडू रुचती गणेशा । तसेच ते मोदकही गणेशा ॥१८॥
उपासना ही बहुसाळ वानीं । न धाय माझें मन वर्णनांनीं ।
म्हणून पादीं शिरसा नमीं मी । सदैव सेवा करवीं म्हणें मी ॥१९॥
(गीति)
आतां वंदन करितों, मोरेश्वरसूत मोरया-बापा ।
न घडो कधिंही अघ हें, अपदेचा ताप घालवीं बापा ॥२०॥
माता नाम असें हें, विद्यादाती सरस्वतीदेवी ।
उदरीं जन्म तियेच्या, झाला म्हणुनी कवित्व हें वदवी ॥२१॥
जनकाचें नाम असें, मोरेश्वर बुद्धि-दायि कवनास ।
मोरेश्वर भक्त बहू, असती म्हणूनी सु-बुद्धि सूतास ॥२२॥
विद्या-दाते गुरु ते, जनकाचे ज्येष्ठ बंधु हे होते ।
निःसिम-भक्त प्रभूचे, नाम महादेव हें तया होतें ॥२३॥
मजला त्रिवर्ग देती, जननी जनका सहीत पितृव्य ।
जन जन्मादि सुविद्या, देउन करवीत हें प्रभू-काव्य ॥२४॥
गणपति-सरस्वतींनीं, जननी-जनकासहीत पितृव्या ।
घालुन प्रणाम त्यांना, अर्पी सुमनें तयां पदीं काव्या ॥२५॥
श्रीगजाननार्पणमस्तु ।
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।
खंड पहिला समाप्त