(गीति)
भूपति भीम विचारी, दक्षाविषयीं मुनींस प्रश्न सती ।
दक्षाचें वृत्त पुढें, सांगा आम्हां अशी असे विनती ॥१॥
गाधिज मुनी म्हणाले, ऐका तुम्ही पुढील कथनातें ।
कौडिन्य नाम नगरा, जवळ असे त्या वनांत वापीतें ॥२॥
वापीतिरास मंदिर, जीर्ण असे त्यामधेंच तो दक्ष ।
मुद्गल शिष्य जपासी, जाउन बैसे जपांत तें लक्ष ॥३॥
मानसपूजनपूर्वक, जपतो कीं त्या गणेशमंत्रास ।
द्वादश वर्षें आणिक, वीसाधिक त्यांत एक तो दिवस ॥४॥
दक्षास उषासमयीं, स्वप्न पडे हें विचित्र शुभकारी ।
गणपतिसमान मोठा, एक करी तो समीप येत तरी ॥५॥
शुंडेंत रत्नमाला, घेउन आला समीप दक्षासी ।
घाली गळ्यांत माळा, स्थापियलें पृष्ठभागिं मग त्यासी ॥६॥
सुंदर सुरेख गुढिया, मालादिक यांकरुन शोभविलें ।
ऐशा नगरामाजी, घेउन जाई असेंच देखियलें ॥७॥
जागृत होउन दक्षें, मातेला वंदिलें पडे स्वप्न ॥
कथिलें सारें तिजला, भाव कधीं तूं असें कसें स्वप्न ॥८॥
माता वदे तयाला, स्वप्नांतिल भाव हा यशद आहे ।
आशीर्वादें त्याला, गौरविलें राज्यलाभ हा आहे ॥९॥
ऐकुन दक्ष वदे तो, मातेला फार फार आनंदें ।
मिळतां राज्य मला तूं, सर्व सुखें लाधशील आनंदें ॥१०॥
कमला म्हणे तयाला, राज्यासनिं तूं अरुढ होशील ।
होई मोद मला जो, त्यापेक्षांही स्वधर्मिं होशील ॥११॥
ईश्वर उदंड देवो, आयुष्यादी समस्त तुजला तो ।
माता आशीर्वादें, वदली हें वृत्त मी नृपा कथितों ॥१२॥