(गीति)
कृतवीर्य जवळ तेव्हां, विधिला बोले महात्म्य दूर्वांचें ।
संकष्टीचें व्रतही, कळलें मजला यथाविधी साचें ॥१॥
यायोगें मन झालें, मुदीत माझें खरोखरी देवां ।
पण माझ्या सूताला, संतति कैसी मिळेल कथिं देवा ॥२॥
ब्रह्मा म्हणे तयाला, संकष्टीच्या व्रतास सांगावें ।
ऐकुन उपाय मग तो, जाई स्वप्नांत तेधवां भावें ॥३॥
अपुली विधिची भाषा, झालेली सर्व त्यास सांगितली ।
संकष्टीचें व्रत ही, सांगुन पोथी तयास ती दिधली ॥४॥
आशीर्वाद तयाला, देउन मग गुप्त जाहला तात ।
कृतवीर्य स्वप्न पाहुन, जागा झाला दिसे अकस्मात ॥५॥
पाहुन पोथी तेव्हां, चिंतन करि संपली असे रजनी ।
नंतर तपसा केली, पूर्ण तिथें देवभाव जाणोनी ॥६॥
परतुन नगरीं आला, बैसे अपुल्या सभेंत कृतवीर्य ।
पंडित समुदायाला, दाखवि पोथी त्वरीत कृतवीर्य ॥७॥
पोथीमध्यें लिहिला, अंगारकि नी प्रमूख संकष्टी ।
व्रतमहिमा विस्तारें, आहे तो पाहती चतुर दृष्टी ॥८॥
पोथीमधील विधि तो, पाहे नृपती करावया भाव ।
चित्तीं धरुन व्रत हें, अणवी अत्री मुनीस तो एव ॥९॥
पाहे मुहूर्त बरवा, घेई उपदेश त्या मुनीकरवीं ।
एकाक्षरमंत्राचा, जपण्यासाठीं अधींच मुनि शिकवी ॥१०॥