(गीति)
हे सोमकांत भूपा, भृगु म्हणती सांगतों कथा पुढची ।
भीमाला दीक्षा दे, एकाक्षरि मंत्र मुख्य जपण्याची ॥१॥
विश्वामित्र तयाला, सांगे जपण्यास शांत तें स्थान ।
दक्षें निर्मित मंदिर, गणपति सन्मुख करी अनुष्ठान ॥२॥
विश्वामित्रें आज्ञा, भीमाला जावयास नगरासी ।
दिधली तेव्हां गेला, पत्नीसह वंदिलें पदा शिरसीं ॥३॥
अपुल्या नृपास पाहुन, मंत्रि तसे नगरवासि जन सारे ।
हर्षित झाले भूपा, शोभविले नगरमार्ग पुर सारें ॥४॥
जैसी अंधा दृष्टी, अथवा सतिला पति दिसे सहसा ।
आनंदयुक्त होती, तैसी झाली समस्त जनमनसा ॥५॥
राणीसहीत भूपति, बैसविती लोक-वृंद शिविकेंत ।
गायन वादन घोषण, करिती ते राजमंदिरा नेत ॥६॥
(ललित)
भीम तो बघे सुदिन हो नृपा ।
योजिलें असे पुनरपी तपा ।
दक्षिं निर्मिजे नविन मंदिरीं ।
जाइजे तिथें तप सुरु करी ॥७॥
भीम तो तिथें तनमनें रमे ।
देव हा तया जगत हें गमे ॥
उच्चनीच हा लघुहि थोर हा ।
भेद हा नसे गमत त्यास हा ॥८॥
सर्वही बघे नमन तो करी ।
दिव्य दृष्टिही बघुन अंतरीं ।
तुष्टला स्वयें प्रभु गजानन ।
देतसे स्वयें म्हणुन दर्शन ॥९॥
(शुद्ध कामदा )
प्रसाद माझा तुज पुत्र होई ।
जगांत त्याची बहु कीर्ति होई ॥
जाईं सुखानें करिं राज्य तूं तें ।
वर्ते स्वधर्मी करिं कर्म जें तें ॥१०॥
अर्पीं मला तें न करीं फलाशा ।
ऐसेंच वर्ते भवपाश नाशा ॥
गणेश देई सुत एक योग्य ।
दानें करी तो नृपतीस योग्य ॥११॥
(गीति)
भूपें सुतास दिधलें, रुक्मांगद नाम हें यथायोग्य ।
बाल्यावस्था सरतां, स्वाधिन केलें बघून गुरु योग्य ॥१२॥
रुक्मांगद बुद्धीनें, योग्य असे म्हणुन अल्प अवधींत ।
संपन्न साग्र विद्या पढवुन गुरु करि कुमार अवधींत ॥१३॥
तारुण्यपणीं त्याला, युवराजाचा करुन अभिषेक ।
उपदेश त्यास दिधला, एकाक्षरि मुख्य मंत्र जो एक ॥१४॥
रुक्मांगद भक्ति करी, गणपतिचरणीं पित्याहुनी अधिक ।
राज्य करी धर्मानें, राष्ट्रामाजी बहूत लौकीक ॥१५॥
एके दिवशीं मृगया, करितां करितां बहूत श्रम पावे ।
फिरतां फिरतां तेथें, ऋष्याश्रमिं पातला असे दैवें ॥१६॥