(शार्दूलविक्रीडित)
पूर्वी जें कथिलें सुतें मुनिस तें सांगे विधी व्यासया ।
सांगे नारद तें नृपास भृगुनें पूर्वींच वृत्तास त्या ।
स्वर्गी मी अमरावतीस सहजीं इंद्रास भेटावया ।
गेलों यास्तव इंद्रपूजन करीं प्रार्थून तोषोनियां ॥१॥
इंद्रानें पुशिलें मला नवलसें वाटे असें सांग हें ।
सांगें मी परिसें प्रभू सुरवरा पृथ्वीवरी वृत्त हें ।
झालेलें फिरतां वनीं नयनिं मी पाहें मुनी-आश्रमा ।
तेथें नांदत गौतमाभिद मुनी त्याची अहिल्या रमा ॥२॥
सौंदर्यें सतिच्या विलोकुन मनीं कामानळें आर्त मी ।
ऐसें रुप असे अलौकिक पहा इंद्रा वदें सत्य मी ।
सावित्री कमला उमा उरवशी इंद्रायणी मेनका ।
इत्यादी ललना तिला बघुनियां लज्जीत होती निका ॥३॥
ऐशी स्त्री अमरावतीस नसणें गौणत्व वाटे मला ।
इन्द्रा मी तुजला खचीत कथितों हेतू मनींचा तुला ।
इंद्रे ऐकुन हें चरित्र सगळें कामीक तो जाहला ।
रुपें गौतम जाहला झडकरी त्या आश्रमा पातला ॥४॥
स्नानासी सरितातिरीं मुनि अशी साधून संधी तिथें ।
जाईं त्या सतीला म्हणे लवकरी शय्या करी गे इथें ।
साध्वी ती पतिला म्हणे पति अतां संध्या जपा सोडुनी ।
माध्यान्हीं रवि हा असे भलतसें वाटे मला हो मनीं ॥५॥
कांते मी नयनीं विलोकित पहा नग्नेंचि ती अप्सरा ।
स्नानासी करितें तशी नदितटीं शृंगारचेष्टा परा ।
देखोनी मदनें मला विरहतो झाला म्हणोनी प्रियें ।
आलों तेथुन मी म्हणून मजला भोगास देईं प्रिये ॥६॥
कामा तृप्त करीं म्हणे लवकरी प्राणास रक्षीं तरी ।
माझें मानस हें निराश करितां शापास देईं तरी ॥
किंवा मी ललने करीन गमना संन्यास घेईं तरी ।
ऐसा तो पतिरुप इंद्र वदतां बोले तथा संकरी ॥७॥
(गीति)
अपुला आश्रम नाथां संध्या पूजा जपादिही विहित ।
सोडून अयोग्य वेळीं भलतें करणें असे नसे उचित ॥८॥
मीं अबलेनें करणें उपदेशातें नसे खरें योग्य ।
मी धर्मपत्नि अपुली यास्तव इच्छेस मानणें योग्य ॥९॥
अपुली आज्ञा मजला वंद्य असे म्हणुन त्यास अनुसरली ।
अंगीं सुगंध येतां चित्तीं शंकीत फार ती झाली ॥१०॥
क्रोधें करुन बोले, नीचा, दुष्टा मला फसविलेंसी ।
पतिच्या रुपा घेउन आला तूं कोण हें वदें मजसी ॥११॥
बोले सत्य षठा हें भस्म करीं मी इथेंच शापून ।
इंद्रें भाषण ऐकुन प्रकटे गौतमरुपास टाकून ॥१२॥
कांपत कांपत बोले आहें मी इंद्र हे मुनीपत्नी ।
मोहित होउन रुपा केलें मीं दुष्ट कृत्य बहु यत्नीं ॥१३॥
झाली गोष्ट पुन्हा ती येत नसे म्हणुन तूं सवें येईं ।
देवांचा राजा मी कथितों तुजला अशांत ये समयीं ॥१४॥
उद्धट भाषण ऐकुन क्रोधें जणुं चेतला असे वणवा ।
इंद्रास भास झाला वर्णावा तो तयांत ये उणवा ॥१५॥
गौतमजाया बोले मूर्खा तूं साधिलेंस हें काय ? ।
पातिव्रत्या भंगुन अनर्थकारक प्रसंग हा काय ॥१६॥
देवांचा राजा तूं, केला नससी विचार पूर्णपणें ।
ऐसें वदून झाली, दुःखार्णविं मग्न तीहि पूर्णपणें ॥१७॥